चीनकडून खत निर्यात बंदीचा फटका; भारतातील या खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

वेगवान नाशिक /किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२३ ऑक्टो २०२५ : – आगामी हंगामात शेतकऱ्यांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. चीन सरकारने काही महत्त्वाच्या खतांच्या निर्यातीवर निर्बंध आणल्याने भारतातील खतांच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
विशेषतः अमोनिअम फॉस्फेट, युरिया, डीएपी (DAP) आणि पालाशयुक्त खते या घटकांवरील निर्यात मर्यादेमुळे पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. भारत दरवर्षी सुमारे अडीच लाख टन खतांची आयात चीनमधून करतो. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम थेट देशांतर्गत बाजारावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक मानली जाते. सध्या काही काळासाठी पुरवठा सुरळीत असला तरी दीर्घकालीन दृष्टीने भाववाढ अटळ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषतः रब्बी हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांवर या वाढीचा आर्थिक भार पडू शकतो.
खत उद्योगातील सूत्रांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता आणि चीनकडून आलेल्या निर्बंधांचा परिणाम भारतातील आयात खर्चावर होईल. त्यामुळे आगामी महिन्यांत खतांच्या किरकोळ दरात ५ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार पर्यायी स्रोतांमधून आयात वाढवण्याचा विचार सुरू असल्याचे कळते. परंतु जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे किंमती स्थिर राहतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
शेतकऱ्यांना मात्र या परिस्थितीत संतुलन साधत खतांचा योग्य वापर व माती परीक्षणावर आधारित शेती पद्धती अवलंबण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.



