
वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला,दि.10 ऑक्टोबर :- येवला तालुक्यातील राहाडी गावात नवीन शाखा पोस्ट ऑफिस (Branch Post Office) सुरु करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश आज दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी मालेगाव टपाल कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आला असून दि. १० ऑक्टोबर २०२५ पासून रहाडी पोस्ट ऑफिस कार्यान्वित होणार आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी रहाडीप्रमाणेच मागणी केलेल्या भुलेगाव येथे देखील पोस्ट ऑफिस मंजूर होण्याची शक्यता असून त्यासाठी देखील टपाल विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरु आहे.
राज्याचे अन्न,नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना मंत्री छगन भुजबळ यांनी दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्र लिहून रहाडी व भुलेगाव येथे पोस्ट ऑफिस सुरु करण्याची मागणी केली होती. यावर दि. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकारात्मक प्रतिसाद देत मा. सिंधिया यांनी राहाडी गावात पोस्ट ऑफिस सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे कळविले होते. तसेच दि. २ जानेवारी २०२५ व दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी देखील मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा पत्र पाठवून याबाबत पाठपुरावा केला होता. मंत्री छगन भुजबळ यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून आज रहाडी येथे शाखा पोस्ट ऑफिस सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
रहाडी शाखा पोस्ट ऑफिस हे येवला सब पोस्ट ऑफिस आणि मनमाड पोस्टल उपविभाग अंतर्गत कार्यरत असणार आहे. तसेच अडसुरेगाव आणि वाघाळा ही गावे आता या रहाडी शाखा पोस्ट ऑफिस अंतर्गत आणली गेली आहेत. त्यामुळे रहाडीसह अडसुरेगाव व वाघाळा या तीन गावांसाठी हे कार्यालय सेवा देणार आहे.
*या पोस्ट ऑफिसममध्ये मिळणार या सुविधा…*
⦁ नोंदणीकृत व जलद टपाल सेवा
⦁ पार्सल व मनी ऑर्डर सेवा
⦁ बचत योजना (SB/RD/TD/SSA), PLI/RPLI व्यवहार
⦁ आर्थिक व्यवहारांसाठी IMA App द्वारे सेवा
⦁ टपाल बॅग वाहतुकीसाठी येवला ते तळवाडे आणि तेथून रहाडीपर्यंत GDS मार्फत वहन
रहाडी पोस्ट ऑफिसचा पिनकोड ४२३४०१ असा असणार आहे. तसेच कार्यालयासाठी आवश्यक नामफलक, फर्निचर आदी साहित्य संबंधित विभागामार्फत लवकरच पोहोचवले जाणार असून तांत्रिक सुविधा (IT 2.0) लागू करण्यात येणार आहेत.
” गावात पोस्टाची सेवा सुरु झाल्याने आम्हाला टपाल व बँकिंग सेवा गावातच मिळणार आहे. येवल्या पासून 30 किमी अंतर असलेल्या या गावात दळणवळण सशक्त करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे”
भागवतराव सोनवणे,
ग्रामस्थ रहाडी तालूका येवला.



