ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – नागरिकांची खासदारांकडे मागणी
Nandgaon News
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – नागरिकांची खासदारांकडे मागणी
वेगवान मराठी : मारुती जगधने
॥नांदगाव 5 ऑक्टोंबर 2025 ॥
नांदगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींच्या वतीने खासदार भास्कर भगरे यांच्याकडे करण्यात आली.
या भेटीत नागरिकांनी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या वाहतूक आणि पाणीनिचऱ्याच्या गंभीर समस्यांकडे देखील लक्ष वेधले. विशेषतः नांदगाव तालुक्यातील रेल्वे भुयारी मार्ग आणि लोहमार्गाखालील मोऱ्या व बोगद्यांमध्ये पावसाचे पाणी साचून रहात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
मांडवड, हिसवळ खुर्द, नांदगाव, परभणी, जळगाव खुर्द, पिंपरखेड आदी भागांतील लोहमार्गाखालील रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प होते आणि ग्रामस्थांना शाळा, बाजारपेठ तसेच रुग्णालय गाठणे कठीण बनते.
या संदर्भात नागरिकांनी मागणी केली की,
- रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गांचा निचरा सुधारावा,
- मोऱ्यांची साफसफाई आणि नवीन ड्रेनेज लाईनची व्यवस्था करावी,
- आणि या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात.
या मागण्यांसाठी शिष्टमंडळाने खासदार भास्कर भगरे यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदय पवार, तसेच परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
खासदार भगरे यांनी या तक्रारींवर सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनाशी तातडीने चर्चा करून आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा अहवाल शासनाकडे पाठवून मदतीसाठी पाठपुरावा करण्याचेही त्यांनी सांगितले.
सदर समस्येमुळे नांदगाव परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, योग्य उपाययोजना न झाल्यास मोर्चा किंवा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे



