ज्येष्ठ नागरिक आत्म्याचे मार्गदर्शक दीपस्तंभ,प्रा. भगवान शिंदे

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम, प्रा. भगवान शिंदे यांचे मार्गदर्शन, विभक्त कुटुंबपद्धतीवर चिंता व्यक्त
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.२आक्टोबर २०२५ :-
“तरुणाई ही देशाचा आत्मा आहे, परंतु ज्येष्ठ नागरिक हे त्या आत्म्याचे मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. त्यामुळे समाजाची खरी संपत्ती ही दोघांमध्ये सामंजस्य आणि संवादातून घडते,” असे स्पष्ट मत प्रा. भगवान शिंदे यांनी व्यक्त केले. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नगरपरिषद सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
प्रा. शिंदे म्हणाले, “आज विभक्त कुटुंबपद्धती वाढत असून त्याचा परिणाम थेट वयोवृद्धांवर होत आहे. करिअरच्या मागे धावणाऱ्या तरुणांनी यशाच्या शिखरावर जाताना आपल्या पायांची मुळे म्हणजे आई-वडील आणि वृद्धांचे स्थान विसरू नये. संस्कारांची पेरणी ही फक्त शालेय पाठ्यपुस्तकातून नाही, तर घरातल्या व्यवहारातून व्हावी लागते. म्हणूनच पालकांनी मुलांना घडविताना आर्थिक शहाणपणा आणि सामाजिक भान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सनपाच्या प्रशासक व मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील होत्या. त्यांनीही ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताचा साक्षीदार असलेला हा वर्ग म्हणजे अनुभवाचा अमूल्य ठेवा आहे. शासनही आता या घटकासाठी विविध योजनांद्वारे सहकार्य करत आहे, पण सामाजिक पातळीवर त्यांचे स्थान अधिक दृढ व्हावे यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल.” कार्यक्रमात सनपा प्रशासकीय अधिकारी विनायक खैरनार, सुरेश बागड, अशोक गुळेचा, बाबुलाल मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठांच्या अनुभवांची, त्यांच्या अडचणींची आणि योगदानाची महती सांगितली. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा उत्तराताई सोनवणे, मंगला मेणे, सुधाकर पाटील, श्रीधर कोठावदे, पोपटराव सोनवणे, रवींद्र मोरे, निंबा राणे, नथू ततार, भास्कर सोनवणे, भिका सोनवणे, वसंत मुंडावरे, केवळ अहिरे, अप्पा नंदाळे, के. यू. सोनवणे, श्रीमती राणे, पारस गुजर, हिरालाल कापडणीस, शुभम खेडकर, मनोहर बोरसे, किशोर सोनवणे यांच्यासह श्री यशवंतराव महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळ, महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक मंडळ व नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार यांनी केले.



