कृषी उत्पन्न बाजार समितीची २२ वी वार्षिक सभा गाजली शेतकऱ्यांचा प्रश्नांचा भडीमार – प्रशासन व संचालक मंडळ निशब्द?
Nandgaon News
- कृषी उत्पन्न बाजार समितीची २२ वी वार्षिक सभा गाजली
शेतकऱ्यांचा प्रश्नांचा भडीमार – प्रशासन व संचालक मंडळ निशब्द
वेगवान मराठीः मारूती जगधने
[नांदगाव दिः 27 सप्टेंबर 2025 ]
कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदगावची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा विद्यमान सभापती दर्शनकुमार अनिल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत शेतकरी व व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या कारभारावर रोखठोक प्रश्नांचा भडीमार केला. अनेक गंभीर मुद्द्यांवर प्रशासन व संचालक मंडळाकडे उत्तरच नव्हते.
“शेतकरी पुत्रांचा सत्कार ठराव कागदावरच”
गेल्या वर्षी पारित झालेल्या ठरावानुसार, शेतकऱ्यांच्या मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण यश मिळविल्यास त्यांचा सत्कार करून प्रोत्साहन द्यायचे होते.
मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही.
“ठराव होतो, पण त्याची अंमलबजावणी मात्र शून्य… शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं मिळतात,”
अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आठ लाखांची भिंत –
न्यायडोंगरी आवारासाठी बांधण्यात आलेली ८ लाख खर्चाची संरक्षक भिंत काही महिन्यांतच तुटली.
“इतका खर्च करून जर काम निकृष्ट दर्जाचे करायचे असेल, तर हा पैसा शेतकऱ्यांचा का वाया घालवला?”
असा सवाल उपस्थित झाला.
उपकेंद्र भाडेकरार –
न्यायडोंगरी बाजार समितीच्या आवारात वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र बांधले गेले आहे. त्याच्या भाडेकराराबाबत विचारले असता प्रशासनाकडे उत्तरच नव्हते.
स्वच्छतागृहाचा प्रश्न – तीन महिन्यांत उपाय?
नांदगाव मार्केट आवारात शेतकऱ्यांसाठी स्वच्छतागृह नसल्याचे निलेश चव्हाण (चांदोरा) यांनी मांडले.
यावर तीन महिन्यांत सुविधा उभारू, असे संचालक मंडळाने आश्वासन दिले.
पूरग्रस्त मदत –
पोखरीचे गायकवाड साहेब यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवण्याचा मुद्दा मांडला. मात्र, यावर प्रशासनाने –
“वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊनच निर्णय करू,”
असे सांगत तो मुद्दा पुढे ढकलला.
व्यापारी परवाने –
न्यायडोंगरीचे जगन पाटील यांनी व्यापारी परवान्यांत होणारा दुजाभाव आणि नियमबाह्य झुकते मापाचा मुद्दा पुराव्यासह मांडला. या खुलाशावर मात्र मंडळातील सर्वच सदस्य गप्प बसले.
धक्कादायक बाब –
न्यायडोंगरी आवारातील मोजणीप्रकरणात समितीचे पैसे खर्च करून दुसऱ्याच खाजगी व्यक्तीची शेतजमीन मोजून घेतल्याचा धक्कादायक खुलासा सभेत करण्यात आला. यामुळे सर्व सभागृह अवाक झाले.
अपंगांसाठी राखीव गाळे –
लेखापरीक्षण अहवालातील अनेक आक्षेप प्रलंबितच आहेत. अपंगांसाठी राखीव व्यापारी गाळे मागणी करूनही अद्याप दिलेले नाहीत. “लवकरच कार्यवाही करू,” एवढ्यावरच संचालक मंडळ थांबले.
सत्कार सोहळा –
या वेळी सर्वाधिक शेतीमाल आणणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मात्र जगन पाटील यांनी उपरोधिक सूचना करत –
“ज्यांनी वर्षभरात एक रुपयाचाही माल खरेदी केला नाही, त्यांचाही सत्कार करावा. खर्च मी उचलतो,”
असे वक्तव्य करून सभागृहात खसखस पिकवली.
सभापतींचे आश्वासन
सभेच्या शेवटी अध्यक्ष दर्शन आहेर यांनी आभार मानले व
“शेतकरी व व्यापारी बांधवांनी केलेल्या सूचनांचा आदर केला जाईल. सर्व समस्या लवकर सोडवू,”
असे आश्वासन दिले. मात्र, उपस्थित शेतकऱ्यांनी “हे आश्वासनं केवळ बोलाचीच कढी ठरू नयेत” अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संचालक तेज कवडे’ सतीष बोरसे ‘एकनाथ सदगीर’ पोपट सानप ‘ समाधान पाटील ‘ सौ . कवडे ‘ भाऊसाहेब काकळीज ‘ कान्हा कलंत्री ‘ निलेश इपर ‘ अनील वाघ ‘ जीवन गरूड यांचेसह शेतकरी व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते .



