- रूट मार्चतून दिलेला
- सलोख्याचा संदेश
वेगवान नाशिक : मारुती जगधने
[दि 5 सप्टेंबर 2025 ]नांदगाव शहरात काढण्यात आलेला पोलिसांचा रूट मार्च हा केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठीचा सराव नव्हता, तर तो नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा उपक्रम ठरला. गणपती उत्सव आणि पैगंबर मोहम्मद जयंती यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर डी.वाय.एस.पी. बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला हा रूट मार्च प्रशासनाची सज्जता आणि लोकसहभाग दोन्ही अधोरेखित करतो.
पोलिसांच्या ताठ मानेने काढलेल्या पायपीटीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश बसतोच, पण त्याचवेळी सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव होते. “संकटावर मात करण्यासाठी पोलिस सदैव सज्ज राहिले पाहिजेत” हा संदेश डी.वाय.एस.पी. महाजन यांनी दिला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या तणावग्रस्त सामाजिक वातावरणात पोलिस दलाने फक्त शिस्त राखणारे यंत्र न राहता, समाजाच्या मनोधैर्याला बळकटी देणारे माध्यम होणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे, गणपती विसर्जनाच्या दिवशी मुस्लिम समाजाने पैगंबर जयंती पुढे ढकलून दिलेला सलोख्याचा संदेश नांदगावकरांच्या धार्मिक एकात्मतेचे उदाहरण आहे. ही घटना आपल्याला स्मरण करून देते की सण-उत्सवांचा खरा अर्थ समाजाला जोडणारा, नात्यांना दृढ करणारा असतो.
अशा वेळी प्रशासन व नागरिक यांचे सहकार्यच सौहार्दाचे खरे भांडार ठरते. रूट मार्चाच्या निमित्ताने तयार झालेली विश्वासाची ही वीट भविष्यात सामाजिक सलोखा मजबूत करणारी पायाभरणी ठरेल.



