एआय मध्ये रोजगार संधींचा खजाना ; मविप्र क.का.वाघ पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात ‘एआय’वर एक दिवशीय कार्यशाळेत सीईओ योगेश आहेर यांचे प्रतिपादन

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद :- एआय मध्ये रोजगार संधींचा खजाना आहे. एआयमुळे नवीन आव्हानांसह नवनवीन सुवर्णसंधी तयार होत आहेत. सायबर सिक्युरीटी, आयओटी, मल्टी एजंट, डेव्हऑप, प्रॉम्प्ट इंजिनियरींगमध्ये लाखो नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. एआय एजंट ट्रेनिंगसाठी माणूसच लागतो.असे प्रतिपादन अॅप्लीकेशन स्क्वेअरचे सीईओ योगेश आहेर यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या कम्प्यूटर सायन्स विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय ‘एआय चॅट बोट बिल्डिंग आणि वेब अॅप्लिकेशन हॅकिंग’ कार्यशाळेत विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते. एआय बरोबर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) और मशीन लर्निंग (एमएल) चे महत्त्व देखील त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना एआय प्रशिक्षण देणाऱ्या क. का. वाघ महाविद्यालयाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर अॅप्लीकेशन स्क्वेअरचे आशिष कवीश्वर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफे. (डॉ.) सुरेश जाधव, प्रा. मनीषा सोनवणे, प्रा.भगवान कडलग, प्रा. किरणकुमार जोहरे, प्रा. नरेंद्र बोरस्ते आदी उपस्थिती होते. यावेळी निवडक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
◆ ‘बग’ शोधा आणि आर्थिक उन्नत व्हा: आशिष कवीश्वर
नेटवर्क व सायबर सिक्युरीटी, फिनटेक मध्ये प्रचंड संधी आहेत. एक बग शोधला तर किमान अडीच लाख रूपये मिळतात. बगहर्ड, मार्कर.आयओ, जिरा, जॅम आणि बगझिल्ला या पाच बग ट्रॅकिंग संस्था/प्लॅटफॉर्म्स सॉफ्टवेअर, वेबसाइट किंवा अॅपमधील बग्ज म्हणजे त्रुटींचे व्यवस्थापन आणि नोंदणी तुमच्या नावाने करीत तुमचा सन्मान करते.
◆विद्यार्थ्यांनी अनुभवले वेब साईट हॅकिंगचे प्रात्यक्षिक
यावेळी थेट महाविद्यालयाच्या संकेतस्थळाचे अॅक्टिव्ह व पॅसिव्ह वेबसाईट हॅकिंग प्रात्यक्षिक, बग शोधण्याचा रियलटाईम डेमो, विविध एआय टूल्स वापरासह विद्य्यार्थांनी अनुभवला.
◆ ‘एआय’साठी ही डार्विनचा सिद्धांत लागू: प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश जाधव*
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश जाधव यांनी ‘एआय’साठी ही डार्विनचा सिद्धांत लागू आहे. चार्ल्स डार्विनचा सिद्धांत सांगत लायकच जगात टिकतात आणि एआय विषयी माहिती अभावी आपण नष्ट तर होणार नाहीना हे तपासून पहायला हवे. मविप्र क.का. वाघ महाविद्यालय हे पुणे विद्यापीठाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील एआय शिकविणारे एकमेव महाविदयालय आहे. मविप्र संस्थेच्या ५०९ शाखांपैकी आघाडीवरील असा महाविद्यालयाचा लौकिक आहे असे ही ते म्हणाले.
प्रथम औद्योगिक क्रांती १७६०-१८४० या कालखंडात यांत्रिकीकरण, वाफेची इंजिने, कापड उद्योग, दुसरी औद्योगिक क्रांती १८७०-१९१४ या कालखंडात विद्युत यंत्रे, स्टील, मोठ्या प्रमाणात कारखान्यांचा विस्तार, तृतीय औद्योगिक क्रांती १९६०-१९८० या कालखंडात संगणक, स्वयंचलन, डिजिटल तंत्रज्ञान, कार्यक्षमता वाढ होत तर चौथी औद्योगिक क्रांती २०१० पासून २०२० अशी सुरू असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), स्मार्ट कारखाने, डेटा-आधारित निर्णय अशी सुरू आहे, काहींच्या मते पाचवी औदयोगिक क्रांती २०२१ सध्या सुरू झाली असून यात मानव-यंत्र एकीकरण, प्रगत एआय, वैयक्तिक उत्पादन असेल, तर सहाव्या औद्योगिक क्रांतीत क्वांटम कम्प्युटर, संपूर्ण स्वायत्त इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्स यातून सामाजिक परिवर्तन घडेल असे ही त्यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत समाज बुद्धिमान व कार्यक्षम बनविणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे चौथ्या आणि पाचव्या औद्योगिक क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आहे, कारण ती डेटा विश्लेषण, स्वयंचलन आणि निर्णय प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे उत्पादकता आणि नाविन्य वाढते. एआयमुळे उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन जीवनात परिवर्तन होत आहे असे ही प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश जाधव यांनी विषद केले.
◆ ‘एआय’साठी वार्षिक १६०० कोटी पॅकेजच्या नोकऱ्या
प्रा.किरणकुमार जोहरे यांनी एआय संदर्भात जागतिक पातळीवर ८०० कोटी ते १६०० कोटी वार्षिक पॅकेजच्या नवनवीन रोजगार संधींविषयी माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील ‘एआय रिसर्च ग्रुप’ आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा प्रकारे योगदान करीत रिसर्चपेपर्स लिहीत आहे व एआय वरील विविध प्रोजेक्टस वर काम करीत आहे याबाबत माहिती दिली.
कार्यशाळेत प्रास्ताविकात कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा.मनिषा बी सोनवणे यांनी आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. इंटरॅक्टिव्ह एआय सिस्टिम डेव्हलपमेंट बद्दल त्यांनी माहिती दिली. परीचय प्रा.सोनाली एस महाले यांनी तर सुत्रसंचालन प्रा.ज्योत्स्ना एस घुले यांनी केले. आभार प्रा.किरणकुमार जोहरे यांनी मानले.
कार्यक्रमात आयक्युएसी प्रमुख प्रा. भगवान कडलग, प्रा.नरेंद्र एन बोरस्ते, प्रा.चैताली एस मेधणे, प्रा.रोहिणी पी पगार, प्रा.अनिता एस मोकाट, प्रा. प्रियंका एस कुंदे, प्रा. प्रांजल आर गाडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल ठुबे, शिवप्रसाद गवळी, पवन मोरे आदींनी परीश्रम घेतले.



