नाशिक ग्रामीण

ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचा हाहाकार : मदतीचे आश्वासन पुरेसे का?

Malegaon news

 


ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचा हाहाकार : मदतीचे आश्वासन पुरेसे का?

वेगवान मराठी : मारुती जगधने

दि . [31 ऑगस्ट 2025 ]

मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. कंधाने, झोडगे, चिखलओहोळ, साजवाळ, शेंदुर्णी, नाळे व पादळदे या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने कांदा, कपाशी व मका यासारखी प्रमुख पिके पाण्याखाली गेली. शेतात साचलेले पाणी, कोसळलेली पिके आणि निराशेने भरलेला शेतकरी—हे दृश्य किती विदारक आहे याचा अंदाज घेताना हृदय द्रवून जाते.

यात भर म्हणजे साजवाळ येथे ठगुबाई जगताप यांच्या म्हशीचा विजेच्या कडकडाटात मृत्यू झाला. महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून शासकीय मदतीचे आश्वासन दिले असले तरी अशा मदतीची प्रक्रिया किती संथ आहे हे शेतकऱ्यांना ठाऊक आहे. मदतीचे आश्वासन मिळणे आणि ती प्रत्यक्ष मिळणे यात प्रचंड फरक आहे.

कृषी क्षेत्राला वारंवार नैसर्गिक आपत्तींचा तडाखा बसत आहे. एकीकडे उघडीपी व दुष्काळ, तर दुसरीकडे ढगफुटी आणि महापुराची संकटे—या दुतर्फा आघाताने शेतकऱ्यांचा कंबरडे मोडले आहे. पण दुर्दैवाने प्रशासनाकडून नेहमीच उशिरा प्रतिसाद मिळतो. शेतकरी संकटात सापडल्यानंतरच पंचनामे, बैठका, घोषणा आणि आश्वासने दिली जातात.

आज प्रश्न असा आहे की, नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन, शेतकऱ्यांसाठी त्वरित मदत योजना, आणि विमा कंपन्यांची जबाबदारी या बाबतीत ठोस धोरण सरकार कधी आखणार? केवळ पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या घरगुती ताटात आश्वासनांचा भात शिजत नाही.

शेतकऱ्याला केवळ दिलासा नाही, तर त्वरित आणि प्रभावी मदत हवी आहे. अन्यथा प्रत्येक ढगफुटीच्या पावसानंतर माळमाथ्यावर फक्त शेतकरीच नव्हे तर शासन व्यवस्थेच्या अपयशाचेही शवपेटीच उघड्या पडतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!