- वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगांव :
. दि . [ 30 ऑगस्ट 2025 ]
नांदगाव तालुक्यातील धनेर येथे सरपंच महिला यांच्यावर झालेल्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये मोठा संताप उसळला आहे. सरपंच महिलेच्या तक्रारीनुसार स्थानिक नागरिक सुनील कदम यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा राग मनात ठेवून सुनील कदम यांनी स्थानिक एका महिलेला हाताशी धरून सरपंच महिला व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खोट्या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या धनेर येथील शेकडो नागरिकांनी नांदगाव पोलिस स्थानकावर मोर्चा काढला.
नागरिकांनी पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने API सुनिल बडे यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून सुनील कदम व त्यांच्याबरोबर खोटी तक्रार करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
पोलिस निरीक्षक भदाणे यांनी नागरिकांना आश्वासन दिले की घटनेची निष्पक्ष तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आश्वासनानंतर नागरिकांनी मोर्चा स्थगित केला.
यावेळी नागरिकांनी एकमुखाने सांगितले की सरपंच महिलेला बदनाम करण्याचा व त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणून खोट्या गुन्ह्यातील संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.



