पोलीस रक्षक कि भक्षक,पोलीसांची दबंगगिरी व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी मध्यरात्री शेतकऱ्याच्या शेतात स्वारी

वेगवान नाशिक /तुषार रौंदळ
विरगांव दि.२२ऑगस्ट २०२५:-
किकवारी (ता.बागलाण) येथील प्रगतशील शेतकरी व यशवंत ग्रामचे प्रणेते केदा बारकु काकुळते यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रावर केळीचे पिकाची लागवड करुन त्यातुन यशस्वी उत्पादन घेतले. या पिकवलेल्या केळीचा सौदा त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका व्यापाऱ्याशी केला होता. टप्याटप्याने पैसे देत व्यापाऱ्याने सुरुवातीचा माल खरेदी केला, मात्र शेवटच्या टप्प्यातील मालाचे पैसे न देता व्यापारी गाडी घेऊन जाण्याची तयारी करत असल्याचे काकुळते यांच्या लक्षात आले. त्यांनी पैसे मागितल्यावर “उद्या पैसे देतो” असे सांगितले तेव्हा काकुळते यांनी व्यापाऱ्याची केळीने भरलेली आपल्या शेतात उभी करून ठेवली होती . ती गाडी घेण्यासाठी व्यापारी परत न आल्याने केळीने भरलेली गाडी शेतात उभी होती.
या संदर्भात केदा काकुळते यांनी सटाणा पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. मात्र, गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास सटाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या आदेशाने किकवारी खुर्द येथे येत त्यांनी काकुळते कामगारांना धमकावले, त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतले आणि गाडी ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढत-चालवत पोलीस स्टेशनला आणली.
या अजब घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थ व शेतकरी संघटनांच्या भावना भडकल्या असुन, “पोलीस संरक्षण देण्याऐवजी दरोडेखोरांसारखी वागणुक देत आहेत ” असा आरोप करत विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी मित्रांनी सटाणा पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. पोलीस प्रशासनावर एक ना अनेक संशय व्यक्त करत प्रश्नांची सरबत्ती केली गेली. याच दरम्यान घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख, गृह मंत्र्यांचे सचिव आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनाही देण्यात आली.
या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांना विचारणा केली असता, त्यांनी “माझ्यावर गुन्हा दाखल करा” असे उर्मट उत्तर दिल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी संघटनांनी पोलिसांवर “रक्षक की भक्षक?” असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी समंजस भूमिका घेत, संबंधित व्यापाऱ्याशी स्पीकरफोनवरून थेट संवाद साधत व्यापाऱ्याला शनिवारी सकाळी ११ वाजता सटाणा पोलीस ठाण्यात हजर राहून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा सज्जड इशारा दिला.
व्यापाऱ्याने ही उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे.
सध्या परिस्थिती तणावपूर्ण असली तरी पोलिसांनी व्यापाऱ्याकडून पैसे मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घटनाक्रमाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून, शेतकरी संघटनांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शेतकरी नेते बिंदुशेठ शर्मा, दिपक पगार, शरद भामरे, राहुल सोनवणे, यशवंत धोंडगे, किरण काकुळते, निलेश सोनवणे, सुरज सोनवणे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी पोलिस स्टेशनला धाव घेत उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी पोलिस बळाचा वापर करुन केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे.



