महाराष्ट्र,देश

अघोरी शक्तीचा दावा करून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; भोंदू कायद्याच्या कचाट्यात, महाराष्ट्र अंनिस व राज्य महिला आयोग कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश

वेगवान नाशिक | किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दि. १९ ऑगस्ट : सातपूर कॉलनीतील सिद्धार्थ भाटे उर्फ सिद्धार्थ गुरु या भोंदूबाबाने “माझ्या अंगात अघोरी शक्ती आहे, मुलीने माझ्याशी लग्न केल्यास ती शक्ती तिलाही मिळेल” असा दावा करून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), नाशिक आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग तक्रार निवारण केंद्र, नाशिक रोड शाखेच्या समुपदेशन विभागाच्या कायदेशीर सल्लागार अॅड. अनिता जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी पीडित मुलीच्या वडिलांना नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. परिणामी, काल रात्री भोंदूविरुद्ध लैंगिक शोषणासंबंधी गंभीर गुन्हा दाखल झाला.

अघोरी शक्तीचा दावा करणे हे देखील जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा असल्याचे अंनिसने स्पष्ट केले असून, पोलिसांनी या कायद्याचे कलम देखील लागू करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या भोंदूबाबाने यापूर्वीही असहाय्य महिला व अल्पवयीन मुलींचे आर्थिक व लैंगिक शोषण केल्याची शक्यता कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करावी व पीडितांनी घाबरून न जाता पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव, महेंद्र दातरंगे, जिल्हा कायदा सल्लागार अॅड. सुशीलकुमार इंदवे, रंजन लोंढे, डॉ. विभावरी गोराणे तसेच राज्य महिला आयोग तक्रार निवारण केंद्राचे चंद्रमोरे, अॅड. प्रभाकर वायचळे, अॅड. प्रशांत खरे, अॅड. पुष्पा ढवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!