मोलमजुरी करून पोलीस दलात दोन वर्षांपूर्वी भरती झालेल्या युवकाची मुंबई येथे आत्महत्या; तालुक्यात शोककळा

मनोज वैद्य/ देवळा
दहा वर्षांपूर्वी पितृछत्र हरपल्यानंतर आईने मोलमजुरी करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलाला मोठे केले व त्या मुलाने देखील आईच्या कष्टाची जाणीव ठेवत महाराष्ट्र पोलीस दलात स्वतःला भरती करून घेतले. परंतु नियतीने या परिवारावर क्रूर डाव साधला व दोन वर्षांपूर्वी पोलीस दलात भरती झालेल्या तरुणांने मुंबई येथे राहत्या घरात दोरीच्या साह्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर तरुण हा देवळा तालुक्यातील वाखारी येथील रहिवाशी असून त्याचे नाव ऋतिक भाऊसाहेब चव्हाण (वय २४) असे आहे.
वाखारी व परिसरात ऋतिक हा अतिशय मनमिळावू तरुण म्हणून परिचित होता. वडिलांच्या मृत्यूनंतर सदर तरुणाने व त्याच्या आईने प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले व तो मुलगा देखील आईच्या कष्टांची जाणीव ठेवून दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाला. त्याची नियुक्ती मुंबई येथील मीरा-भाईंदर येथे झाली. तो त्या ठिकाणी आपल्या आईबरोबर वास्तव्यास होता, परंतु आई ही रक्षाबंधनानिमित्त त्याच्या बहिणीकडे आली असता त्याने दि.१४ ऑगस्ट रोजी राहत्या घरात दोरीच्या साह्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजले नसले तरी सदर तरुणाच्या मृत्यूची वार्ता वाखारी व परिसरात पसरताच सर्व गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सदर तरुणावर वाखारी येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.



