नांदगाव शहरात गणेश विसर्जन उत्साहात संपन्न; प्रशासनाच्या संयुक्त नियोजनामुळे सुरळीत व्यवस्था
Nandgaon News

नांदगाव शहरात गणेश विसर्जन उत्साहात संपन्न; प्रशासनाच्या संयुक्त नियोजनामुळे सुरळीत व्यवस्था
वेगवान मराठी ; मारुती जगधने 26 सप्टेंबर 2026
नांदगाव शहर व परिसरात गणेशोत्सवाची सांगता श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाने अत्यंत उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात झाली. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संपूर्ण शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासन, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त व नियोजनबद्ध सहकार्यातून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान मुख्य चौकांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी व नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती संकलन केंद्र
पर्यावरणाचे रक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. नागरिकांनी घरगुती गणेशमूर्ती या संकलन केंद्रांवर जमा करून प्रशासनाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संकलित करण्यात आलेल्या मूर्तींची स्वतंत्रपणे आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
नाग्यासाक्या व माणिकपूज धरणावर विसर्जन
नांदगाव शहर व परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन नाग्यासाक्या धरण आणि माणिकपूर धरण येथे करण्यात आले. विसर्जन स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
पोलीस, महसूल आणि नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयामुळे गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडला. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत सहकार्य केले, ज्यामुळे यंदाचा विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.



