बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार दिलीप बोरसे यांचे मंत्र्यांकडे निवेदन
Nandgaon news

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार दिलीप बोरसे यांचे मंत्र्यांकडे निवेदन
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिके संकटात; चारा व पाणीटंचाईवर तातडीच्या उपाययोजनांची
वेगवान मराठी : मारुती जगधने२५/९/२०२६
नाशिक/सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागात समावेश करावा, अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नाशिक येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी बागलाण तालुक्यातील पावसाची स्थिती, खरीप पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी तसेच पशुधनासाठी निर्माण झालेला चारा व पाणीटंचाईचा प्रश्न याबाबत आमदार बोरसे यांनी मंत्र्यांशी चर्चा केली.
यंदाच्या पावसाळ्यात बागलाणमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने मका, बाजरी, कांदा यांसह विविध पिकांवर परिणाम झाला असल्याचे वृत्त आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला बागलाणमध्ये ३० ते ४० दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला होता.
शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान वाढत असून आगामी काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने बागलाण तालुक्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार बोरसे यांनी केली.
दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीही स्थापन करण्यात आली आहे.
बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा तसेच आवश्यक त्या शासकीय सवलती मिळाव्यात, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
— वेगवान मराठी : मारुती जगधने



