
नांदगाव महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन विषयक कार्यशाळा
वेगवान मराठी : मारुती जगधने दि 3 July 2026
नांदगाव : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नाशिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम २०१३” या विषयावरील कायदेविषयक प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. ए. आर. मराठे, प्रा. डी. एम. राठोड, प्रा. बी. के. पवार आदी उपस्थित होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नांदगाव तालुका सचिव प्रा. सुरेश नारायणे यांनी “अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन” या विषयावर मार्गदर्शन करताना अफवा व अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता आणि संविधानिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले. बार्टी समतादूत शिल्पा मालपूरे यांनी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेत जादूटोणा, भूत-भानामती, नरबळी, तंत्र-मंत्र, समज-गैरसमज यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन व कायद्याच्या तरतुदींबाबत प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. के. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डी. एम. राठोड यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



