महाराष्ट्र,देश

मका हमीभावाला मुदतवाढ द्या अन्यथा हजारो शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड!

मका हमीभावाला मुदतवाढ द्या अन्यथा हजारो शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड!

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला दिनांक :25 फेब्रुवारी/शासकीय आधारभूत किंमत (एमएसपी) अंतर्गत मका खरेदी योजनेची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत मर्यादित असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुनील देशमुख, सचिव बाबासाहेब जाधव तसेच सर्व संचालक मंडळाने शासनाकडे तातडीने किमान १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची जोरदार मागणी केली आहे.
तालुक्यात आतापर्यंत २,१९४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात केवळ ४७० शेतकऱ्यांचीच मका खरेदी पूर्ण झाली आहे. उर्वरित शेतकरी प्रतिक्षेत असून, मुदत संपल्यास त्यांना खुल्या बाजारात तोट्याने विक्री करावी लागणार आहे.
सध्या बाजारात मका १,६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात असताना शासनाचा हमीभाव २,४०० रुपये प्रतिक्विंटल आहे. म्हणजेच प्रति क्विंटल सुमारे ८०० रुपयांचा मोठा फरक पडत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

……….. प्रतिक्रिया

चेअरमन सुनील देशमुख
शासनाने जाहीर केलेला हमीभाव हा शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान आहे. मात्र नोंदणी करूनही मोठ्या संख्येने शेतकरी खरेदीपासून वंचित राहिले आहेत. खरेदी केंद्रांवरील मर्यादित गती, तांत्रिक अडचणी आणि वाहतूक प्रश्न यामुळे खरेदी प्रक्रियेला विलंब झाला. त्यामुळे शासनाने किमान १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी. अन्यथा हजारो शेतकऱ्यांना खुल्या बाजारात तोट्याने मका विकावा लागेल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

…,,….. प्रतिक्रिया…
सचिव
बाबासाहेब जाधव ‘
खरेदी-विक्री संघाचे सचिव बाबासाहेब जाधव म्हणाले,
नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी करण्याची आमची भूमिका ठाम आहे. खरेदी केंद्रांवरील कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मात्र शासनाने मुदतवाढ दिल्यास उर्वरित सर्व शेतकऱ्यांचा मका स्वीकारणे शक्य होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे.

…… प्रतिक्रिया
देविदास घोलप शेतकरी (वडगाव, ता. येवला) यांनी सांगितले,
आम्ही वेळेत नोंदणी केली, कागदपत्रे दिली पण खरेदीची तारीखच मिळाली नाही. बाजारात १,६०० रुपये दर आहे. खर्चच निघत नाही. शासनाने मुदत वाढवून आमचा मका हमीभावाने घ्यावा, हीच अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया……
नंदू सोमशे (वाघाळे, ता. येवला)

बी-बियाणे, खते, मजुरी यांचा खर्च वाढला आहे. हमीभाव हा आमचा आधार आहे. तोच जर मिळाला नाही तर शेतकरी आर्थिक संकटात सापडेल.

संचालक मंडळाची ठाम भूमिका
खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाने ठराव करून शासनाला निवेदन पाठवले असून, ‘शेतकरी वाचवा, हमीभाव वाचवा’ अशी भूमिका घेतली आहे. खरेदी प्रक्रियेचा वेग वाढवून उर्वरित सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका स्वीकारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, तालुक्यातील शेतकरी संघटना व सामाजिक संस्थांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हमीभावाच्या आशेवर मका साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे भवितव्य आता शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे. मुदतवाढ मिळाल्यास हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल; अन्यथा आर्थिक फटका बसण्याची शक्यता अधिक

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!