नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

आदिवासी पारधी समाजाच्या विकासासाठी शिक्षणाची कास धरा अस्वलदरा येथे आदिवासी पारधी जमात जनजागृती मेळावा; विविध शासकीय योजनांची चित्रफितीद्वारे माहिती

नांदगांव

आदिवासी पारधी समाजाच्या विकासासाठी शिक्षणाची कास धरा

अस्वलदरा येथे आदिवासी पारधी जमात जनजागृती मेळावा; विविध शासकीय योजनांची चित्रफितीद्वारे माहिती

वेगवान मराठी ; मारुती जगधने २३ September २०२६
नांदगाव

: आदिवासी पारधी समाजाने शिक्षण, संस्कार आणि आधुनिकतेची कास धरून समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किसन खताळे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.

आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अस्वलदरा, ता. नांदगाव येथे आदिवासी पारधी जमात जनजागृती मेळावा उत्साहात पार पडला. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, कळवण डॉ. कश्मिरा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे अध्यक्ष दीपक खांदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.

यावेळी गटविकास अधिकारी किसन खताळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नितांत कांबळे, निरीक्षक साहेबराव सोनवणे, सांख्यिकी सहाय्यक ओम गवळे, पंचायत समिती विस्तार अधिकारी आनंद यादव, साकोरा ग्रामपंचायत प्रशासक अतुल पाटील, ग्रामसेवक उमेश निकम, अस्वलदरा माजी ग्रामपंचायत सदस्य नरहरी भोसले, सारताळे आश्रमशाळेचे प्राचार्य समाधान चौधरी, एस. ए. पाटील, प्रकाश गावीत, अधीक्षक रवींद्र पाटील, दिनेश पगार, पत्रकार भगवान हिरे आदी उपस्थित होते.

चित्ररथाद्वारे योजनांची माहिती

मेळाव्यात चित्ररथाद्वारे विविध शासकीय योजनांच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या. पारधी समाजासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, सुविधा आणि विकासाच्या संधींची उपस्थितांना माहिती देण्यात आली. समाजातील नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

शासन व प्रशासन समाजाच्या पाठीशी असून कळवण प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सहाय्यक प्रकल्प अधिकारी नितांत कांबळे व निरीक्षक साहेबराव सोनवणे यांनी दिली.

व्यसनमुक्ती आणि शिक्षणावर भर

आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे अध्यक्ष दीपक खांदे यांनी समाजातील व्यसनाधीनता व निरक्षरतेबाबत चिंता व्यक्त केली. समाजाने शिक्षण, संस्कार आणि आधुनिकतेची कास धरून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणावे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने सज्ज राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी वस्त्यांवर जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या समजून घेत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारताळे आश्रमशाळेचे प्राचार्य समाधान चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन आमोदे आश्रमशाळेचे प्राध्यापक स्वप्नील बच्छाव यांनी केले. कार्यक्रमास पारधी समाजातील महिला-पुरुष, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सारताळे व न्यायडोंगरी आश्रमशाळेच्या वतीने उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!