नाशिक ग्रामीण

अथर्व मोकळचे घवघवीत यश

Nandgaon News

Writing
JEE Advanced 2026 मध्ये अथर्व मोकळचे घवघवीत यश; सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
नाशिक : देशातील अत्यंत प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या JEE Main व JEE Advanced 2026 परीक्षेत अथर्व गायत्री बाळासाहेब मोकळ याने उल्लेखनीय यश संपादन करून नाशिक जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
यंदा JEE Main 2026 परीक्षेसाठी देशभरातून सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ सुमारे 1.87 लाख विद्यार्थ्यांना JEE Advanced परीक्षेसाठी पात्रता मिळाली. या विद्यार्थ्यांमधून अंतिमतः केवळ 56,880 विद्यार्थी पात्र ठरले. अशा अत्यंत कठीण आणि तीव्र स्पर्धेत अथर्वने OBC-NCL प्रवर्गात 950 वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे.
अथर्व हा योगगुरू बाळासाहेब मोकळ व गायत्री मोकळ यांचा सुपुत्र आहे. लहानपणापासूनच त्याच्यावर योग, शिस्त, सातत्य, सकारात्मक विचार आणि परिश्रम यांचे संस्कार झाले. योगदर्शन योग केंद्राच्या वातावरणात वाढलेल्या अथर्वने अभ्यासाबरोबरच मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास यांनाही तितकेच महत्त्व दिले.
या यशामागे अथर्वची अथक मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य नियोजन हे महत्त्वाचे घटक ठरले. दोन वर्षांच्या कालावधीत त्याने नियमित अभ्यास, वेळेचे काटेकोर नियोजन, सराव चाचण्या आणि विषयांचे सखोल आकलन यांवर भर देत आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला. अनेक आव्हाने आणि ताणतणावांना सामोरे जात असतानाही त्याने चिकाटी सोडली नाही आणि अखेर आपल्या कष्टांचे सोनं केले.
अथर्वच्या या दैदिप्यमान यशाबद्दल ३ जून रोजी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका डॉ. सीमाताई ताजणे, मित्र मेळा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ताजणे, माजी पोलीस निरीक्षक रमेश भवर, माजी सैनिक ज्ञानेश्वर राऊत, सुखदेव मोकळ, सामाजिक कार्यकर्ते विलासभाऊ थोरात, अमान शेख, कुवर साहेब, श्रीधर मोटकरी, निकेतन मिसाळ, नितीन महाजन, दिपाली कोठुळे, रोहिनी थोरात, मेघा बोडके, नलिनी कड, कृणाल बच्छाव, सुदीप मोकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी अथर्वचे अभिनंदन करून त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अथर्वच्या यशामागील त्याची मेहनत, पालकांचे मार्गदर्शन, योगसंस्कार आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका अश्विनी पुरी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी गायत्री मोकळ यांनी उपस्थित मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व शुभेच्छुकांचे आभार मानले.
अथर्वच्या या यशामुळे मोकळ परिवार, योगदर्शन योग केंद्र तसेच संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!