शेती

कांदा उत्पादकांसाठी डॉ. राहुल आहेर सरसावले ; मुख्यमंत्री व पणन मंत्र्याकडे शिफारस!

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : चांदवड-देवळा मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थानिक आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सध्या कांद्याला मिळत असलेल्या अल्प बाजारभावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. आहेर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांना पत्र पाठवून नाफेडमार्फत कांद्याची विक्री थांबवण्याची शिफारस केली आहे, जेणेकरून बाजारातील दर स्थिर राहण्यास मदत होईल.

नाशिक जिल्ह्यासह चांदवड-देवळा भागात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु सध्या प्रतिकिलो १३ ते १५ रुपये इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र निराशा आणि असंतोष पसरला आहे.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी डॉ. आहेर यांनी सरकारकडे विनंती केली आहे की, नाफेडने बाजारपेठेत विकण्यासाठी घेतलेला कांदा सध्या विकू नये. वास्तविक पाहता, नाफेडचा उद्देश बाजारातील भाव स्थिर ठेवणे हा असतो. त्यामुळे सध्या भाव कमी असताना नाफेडने विक्री करणे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालणारे ठरू शकते. म्हणूनच, कांदा उत्पादकांच्या हितासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी केंद्राकडे योग्य ती शिफारस करून नाफेडची विक्री थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

डॉ. आहेर नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असतात. विधानसभेत पीक विमा, शेतकऱ्यांचे कल्याण आणि शेतमालाच्या बाजारभावावर नियंत्रण यांसारख्या विषयांवर सातत्याने प्रश्न विचारून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!