बिबट्याचा धुमाकूळ सुरुच .. वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

बिबट्याचा धुमाकूळ कायम; गीर गाईच्या वासरावर हल्ला करून ठार, वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.१६सप्टेंबर२०२५:- अंबासन गावाच्या वळवाडे शिवारातील शेतकरी सध्या बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे धास्तावले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून या परिसरात बिबट्याची सतत हालचाल जाणवत असून, त्याचे थेट दर्शन अनेक वेळा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे पाळीव जनावरांवर आणि कुत्र्यांवर हल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अलीकडील एका धक्कादायक घटनेत बिबट्याने गीर जातीच्या गाईच्या वासरावर हल्ला करून त्याचा मृत्यू ओढवला आहे.
शेतकरी दावल चंदा अहिरे यांच्या गोठ्यात घडली. अहिरे हे नेहमीप्रमाणे पहाटे गोठ्याकडे गेले असता त्यांनी लोखंडी जाळी तुटलेली आणि वासराचे रक्ताने माखलेले मृत शरीर पाहिले. घटनास्थळी बिबट्याचे पंजांचे ठसे, रक्ताचे डाग आणि ओढत नेल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसून आल्या. बिबट्याने लोखंडी जाळी उचकटून गोठ्यात प्रवेश केल्याने त्याच्या धिटाईची कल्पना करता येते. घटनास्थळी मालेगाव वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरु केली आहे. मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, फक्त पंचनामा करून वनविभाग मोकळा होतो आणि प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे बिबट्याचा उपद्रव कायम असून शेतकरी भयभीत आहेत.शेतकऱ्यांचा आरोप आहे की, बिबट्याची हालचाल दिवसेंदिवस अधिक धिटाईने होत आहे. आता तो रात्रीच्या वेळीच नव्हे तर संध्याकाळी आणि पहाटे देखील वावरू लागला आहे. यामुळे भविष्यात मानवी जीविताला देखील धोका निर्माण होऊ शकतो. ग्रामीण भागात लहान मुले, महिला आणि वृद्ध लोक मोठ्या भीतीत वावरत आहेत. सद्यःस्थितीत वनविभागाकडून अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. मात्र या घटनांमुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि तत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास शेतकऱ्यांचा संयम सुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वेळोवेळी तक्रारी करूनही वनविभाग फक्त कागदोपत्री काम करतो. प्रत्यक्षात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले जात नाहीत, ना गस्त वाढवली जाते. बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे आणि त्याच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शिवारात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शेतकऱ्यांची मागणी
शेतकरी वर्गाने वनविभागाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे.
त्यांची प्रमुख मागणी पुढीलप्रमाणे:
1. बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा.
2. ग्रामीण भागात वनविभागाने गस्त वाढवावी.
3. हल्ला झालेल्या जनावरांचे नुकसान भरपाई तातडीने द्यावी.
4. शेती आणि गोठ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात.



