सिन्नर मध्ये गॅस सिलेंडरचा मोठा काळाबाजार, पोलिसांनी छापा टाकला अन….

शरद शेळके /वेगवान न्यूज
सिन्नर: सिन्नर मध्ये गॅस सिलेंडरचा होणारा काळा बाजार पोलिसांनी छापा टाकत उघड केला आहे.घरगुती गॅस हा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीर पणे भरत असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला आहे. यात 43 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
वावी पोलीस ठाणे हद्दीत दोडी गावचे शिवारात काही संशयीत इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरकरीता वापर होणारे निळे गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलींग करत असल्याची बातमी स्थागुशाचे पथकास मिळाली होती. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, संशयीत इसम नामे १) रामदास सुकदेव केदार, वय ५०, रा. दोडी, ता. सिन्नर, जि. नाशिक व २) कैलास अर्जुन केदार, रा. दोडी, ता. सिन्नर हे शासनाने नियमन केलेले व जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ कलम २ (५) मधील नमूद जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारे घरगुती गॅस सिलेंडरमधुन व्यापारी वापराकरीता वापरण्यात येणा-या (निळ्या रंगाचे) गॅस सिलेंडरमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसतांना निश्काळजीपणे गॅस रिफिलींग करून विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आले असून त्यांचे विरूध्द वावी पोलीस ठाणेस गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर छापा कारवाई मध्ये वरील इसमांचे कब्जातून घरगूती वापराचे ३५ गॅस सिलेंडर, व्यापारी वापराचे निळे रंगाचे ०८ गॅस सिलेंडर असे एकुण ४३ गॅस सिलेंडर, इलेक्ट्रीक वजनकाटा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे ०२ पिस्टन पंप व इलेक्ट्रीक मोटर, गॅस टाकीचे प्लॅस्टिक सिल असा एकुण १,७५,४००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, वावी पो.स्टे. वे सपोनि श्री. गणेश शिंदे, पोउनि सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार विनोद टिळे, सतिष घुटे, दिपक गुंजाळ, आबा पिसाळ, माधव साळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.



