विंचूर औद्योगिक वसाहतीत एमडी ड्रग्सचा मोठा साठा जप्त नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक विशेष पथक व लासलगाव पोलिसांची धडक कारवाई

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद ता.२१ जाने २०२६ :- नाशिक जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण पोलिस यांच्या संयुक्त पथकाने
विंचूर औद्योगिक वसाहत परिसरात छाप्यात तब्बल ७०१ ग्रॅम ०५ मिलीग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे.
अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक
विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती तात्काळ लासलगाव पोलिस ठाणे प्रभारी भास्करराव शिंदे यांना कळविण्यात आली. त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संयुक्त पथकाने सापळा रचला. दि.२० जानेवारी २०२६ रोजी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास, लासलगाव पोलिस ठाणे हद्दीतील विंचूर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच इस्लामपुरा, विंचूर येथे ही कारवाई करण्यात आली. सापळ्यादरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना एनडीपीएस कायदा कलम ५० अंतर्गत त्यांचे हक्क समजावून सांगून पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार सुमारे ४९ लाख १० हजार ५०० रुपये किमतीचे एमडी ड्रग्स तसेच दुचाकी, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ५० लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी याकूब खालिद मोमीन (वय ४६, रा. इस्लामपुरा, विंचूर, ता. निफाड) व संदेश अंबादास फापाळे (वय ३५, रा. मरळगोई) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सर्व मुद्देमाल पंचनाम्याने सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी पो.हवा.भाऊ पांडुरंग झाडे यांचे फिर्यादीवरून
लासलगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) २२(ब) व २९ अन्वये सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिक्षक
नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील, पोलिस उपअधिक्षक कांतिलाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे करीत आहेत.
निफाड तालुक्यातील अमली पदार्थ विरोधी ही सर्वात मोठी कार्यवाही असून या कारवाईमुळे निफाड तालुक्यातील अमली पदार्थ विक्री साखळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.



