नाशिक ग्रामीण

प्लॅस्टिक ड्रमच्या आडोशाला अवैध मद्यतस्करी उघडकीस ; मुंबई – आग्रा महामार्गावर २० लाखांचा मद्यसाठा जप्त; नाशिक ग्रामीण पोलिसांना यश

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद ता.२१ जाने २०२६ :- नाशिक जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरून होणारी अवैध मद्यतस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई – आग्रा महामार्गावरून नाशिकहून धुळेच्या दिशेने एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोकणगाव फाटा उड्डाणपुलाजवळ वाहन तपासणीचा सापळा रचला.

तपासणीदरम्यान आयशर कंपनीचा ट्रक (क्र.एम.एच.०४ एफ डी.६६५५) अडविण्यात आला. ट्रकच्या मागील बाजूस प्लॅस्टिकचे रिकामे ड्रम आडोशासाठी ठेवून त्यामागे केंद्रशासित प्रदेश दिव – दमण येथील विदेशी मद्याचा साठा लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत २०० बॉक्स विदेशी मद्य (किंमत अंदाजे २०,२५,२४० रुपये), आयशर ट्रक (किंमत ६,००,००० रुपये), एक मोबाईल फोन (१०,००० रुपये) व ३१ प्लॅस्टिक ड्रम (३१,००० रुपये) असा एकूण २६,६६,२४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी ललित हरिराम सोनी (वय ४०), रा. राहीवाली वास, सिवाना, ता. शिवाना, जि. बाडमेर, राज्य राजस्थान यास अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून अवैधरित्या मद्य विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०९/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत.

ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे तसेच पोलीस अंमलदार दिपक गुंजाळ, विश्वनाथ धारबळे, सुभाष चोपडा, केतन कापसे, योगेश कोळी, संदीप राठोड व श्रीराम वारुंगसे यांच्या पथकाने केली आहे.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!