नाशिक ग्रामीण

देवळा पोलिसांची मोठी कारवाई! ; दोघांना अटक

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : देवळा पोलीस ठाणे हद्दीतून दोन आठवड्यांपूर्वी चोरीस गेलेला ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली पोलिसांनी जालना जिल्ह्यातून हस्तगत केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ओमकार दळे (रा. अंदरसुल, ता. येवला) यांचा स्वराज ट्रॅक्टर (क्र. MH-15 BS-7351) हा सुभाष नगर, देवळा येथील सुनील बाळू अहिरराव यांच्या घरात शेतीच्या कामासाठी आणला होता. दि. ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने हा ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेली होती. याप्रकरणी अनिल दळे यांच्या तक्रारीवरून दि. ९ रोजी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरीस गेलेला ट्रॅक्टर मनमाड मार्गे नगर रोडने गेल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर  स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्याच्या तयारीत असलेल्या अमोल सायराम गायकवाड आणि गोविंद निवृत्ती पवार (दोघे रा. बेलगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या दोन आरोपींना अटक केली होती.

हे आरोपी नाशिक जिल्ह्यात आले असल्याची माहिती मिळाल्याने देवळा पोलिसांनी संशय बळावून सदर आरोपींना जि. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहुन वर्ग करुन ताब्यात घेत दि.२३ रोजी सदर गुन्ह्यात देवळा पोलीस ठाणेस अटक करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपींनी ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, चोरी केलेला ट्रॅक्टर व ट्रॉली बाजारवाहेगाव, ता. बदनापूर, जि. जालना येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या सूचनेनुसार देवळा पोलिसांनी आरोपींसह जालना गाठले आणि ६ लाख५० हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व निळ्या रंगाची ट्रॉली हस्तगत केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. १० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. भास्कर सोनवणे आणि पो. अंम. संदीप चौधरी यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देवळा पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!