बागलाणमध्ये परतीच्या पावसाचा कहर,भिंत कोसळुन तीन ठार, शेतीचे प्रचंड नुकसान,प्रशासनाची पाहणी .मदतीचे आश्वासन

परतीच्या पावसाचा बागलाणमध्ये कहर : भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू, शेतीचे प्रचंड नुकसान
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.२८सप्टेंबर २०२५:-
परतीच्या पावसाने सटाणा तालुक्यात थैमान घातले असून, अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांची भिंत कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर शेतमालाचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिके आडवी पडली असून, अनेक ठिकाणी वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांवर संकट कोसळले आहे.
वादळी वाऱ्याने घरांची पडझड, भिंत कोसळून तिघांचा मृत्यू
शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी तालुक्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह धुवांधार पाऊस झाला. यावेळी गोराणे गावात निर्मलाबाई नामदेव सोनवणे (वय ४३) आणि देवचंद गोपाळ सोनवणे (वय ९४) यांचे घर कोसळले. भिंतीखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत मौजे टेंभे खालचे येथे कस्तुराबाई भिका अहिरे (वय ६५) यांचे घरही पावसात भुईसपाट झाले व त्या देखील भिंतीखाली सापडून मृत्यूमुखी पडल्या.
सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
*शेतीचं मोठं नुकसान, पोल्ट्री फार्मही उध्वस्त..
पावसामुळे टेंभे, आखतवाडे, गोराणे, मोराणे,डोंगरेज,वटार,विरगांव वनोली,तरसाळी,चौंधाणे आदी गावांमध्ये उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापूस, बाजरी, मका,कांदा ,कांदा रोपहि पिके आडवी झाली आहेत. याशिवाय, अनेक पोल्ट्री फार्मची पत्रे उडाली असून, काही ठिकाणी संपूर्ण फार्मच उध्वस्त झाले आहेत. घरांच्या छप्परांचेही नुकसान झाले असून, अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत.
*प्रशासनाची पाहणी, मदतीचं आश्वासन…
बागलाणचे आमदार दिलीप बोरसे आणि तहसीलदार कैलास चावडे यांनी पावसामुळे प्रभावित भागांची पाहणी करून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी शोकसंवेदना व्यक्त करून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. तहसीलदार कैलास चावडे म्हणाले, “प्रत्येक मृत व्यक्ती, शेती व घरांचे नुकसान यांचे पंचनामे करून शासनाकडे मदतीसाठी अहवाल पाठवला जात आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासन त्यांच्यासोबत आहे.”
*धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला..
पावसाचा जोर लक्षात घेता पाटबंधारे विभागाने हरणबारी धरणातून सकाळी १६४३ क्यूसेक्सने मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. काही तासांतच हा विसर्ग २५८८ क्यूसेक्सवर पोहोचला आणि दुपारपर्यंत तो ३१२८ क्यूसेक्सपर्यंत गेला.
पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता शुभम चौधरी यांनी सांगितले की, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरस्थिती निर्माण होऊ शकते.
*पुढील काही दिवस हवामानाचा अलर्ट..
हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी जेष्ठ नागरिक, लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
फोटो : १) गोराणे येथे घराच्या भिंतीखाली सापडलेले मृत व्यक्ती,
२) वादळामुळे उडालेले पोल्ट्री फार्मचे पत्रे, ३) नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे आदि.



