नाशिक ग्रामीण

भिकेच्या भांड्यातून फुलले आयुष्य ; धुळीत लोळणाऱ्या दोन जीवांना मानवीतेचा हात; तहसील कार्यालयातून मिळालं नवं आयुष्य ; निफाडचे तहसिलदार मा.विशाल नाईकवाडे यांचे हस्ते जन्म प्रमाणपत्र वितरण

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दिनांक २७ नोव्हेंबर २०२५:- गजबजलेल्या रस्त्यावर भीक मागत जगणाऱ्या दोन भटक्या मुली…हातात रिकामं भांडं, चेहऱ्यावर भिती ..या चिमुरड्या ठरल्या नशेत बुडालेल्या आईच्या बेफिकीरीची थेट बळी. आधार नाही, संरक्षण नाही आणि ओळख तर पूर्ण हरवलेली. मात्र, एका संवेदनशील नजरेने पाहिलेल्या या चित्रानं अखेर त्यांच्या आयुष्याला नवं वळण दिलं. पिंपळगावचे पत्रकार गणेश शेवरे, उद्धवराजे शिंदे आणि गोकुळ खैरनार यांनी ही बाब पिंपळगाव ब. पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यापर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच तिवारी यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक सर्व प्रक्रिया सुरू करून दोन्ही मुलींची तात्काळ सुटका केली आणि त्यांना सुरक्षित निवारा मिळवून दिला. सैंगऋषी अनाथ वृद्धाश्रम, लौकी शिरसगाव ता.येवला येथे आश्रमाचे संस्थापक नवनाथ नारायण जऱ्हाड यांनी कोणताही भेदभाव न करता त्या दोन्ही मुलींचा प्रेमाने स्वीकार केला.
मुलींकडे जन्म दाखला, कुठलीही नोंद किंवा शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्र नव्हते. जन्म दाखल्यासाठी पिंपळगाव बसवंत नगरपालिकेत अर्ज देण्यात आला. कर्मचारी राकेश देशमुख, संतोष डेरे आणि संपूर्ण चमूने संवेदनशीलतेने काम करत प्रक्रिया विलंब न लावता पुढे नेली. मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशांमुळे तसेच निलेश लचके, लासलगाव आणि संतोष गिरी, निफाड यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम अधिक गतिमान झाले. शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकारी संजय कुसळकर यांनी मुलींची शैक्षणिक पात्रता तपासली, वयाची अधिकृत पडताळणी आणि जन्म दाखला जारी करण्याची महत्त्वाची जबाबदारी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि त्यांच्या चमूने अत्यंत दक्षतेने पार पाडली.
अखेर संविधान दिनी या दोन्ही चिमुरड्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिला अधिकृत दस्तऐवज जन्मदाखला मिळाला. रेणुका संतोष पवार आणि लक्ष्मी संतोष पवार या नावांनी त्यांची नवी, अधिकृत ओळख समोर आली. एकीचा चौथीत आणि दुसरीचा तिसरीत प्रवेश निश्चित झाला असून शिक्षणाची बंद दारे पुन्हा एकदा त्यांच्या पुढे रुंदावून उघडली आहेत.
रस्त्यावर भटकणाऱ्या, भीक मागून जगणाऱ्या या दोन चिमुरड्यांना आज सुरक्षित छत, मायेची साथ आणि सन्मानाच्या शिक्षणाची पहिली पायरी लाभली आहे. पत्रकार, पोलीस यंत्रणा, आश्रम, नगरपालिका, शिक्षण विभाग आणि तहसील प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दोन निराधार जीवांच्या भविष्यात उजेड पेरला आहे. धुळीत लोळणाऱ्या या दोन कळ्या आज नव्या भविष्याच्या बागेत फुलण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची ही जिवंत साक्ष.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!