पंजाब राज्यातील विदेशी मद्यसाठयाची महाराष्ट्रात तस्करी रोखण्यात ग्रामीण पोलीसांना यश ; मुंबई–आग्रा महामार्गावर ११ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दिनांक १४ नोव्हेंबर :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून होणारी अवैध मद्यतस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार सीमावर्ती भागात सर्वत्र कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून मुंबई–आग्रा महामार्गावर पाचोरे-वणी परिसरात तब्बल ११ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, धुळेहून नाशिककडे येणाऱ्या एका टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची तस्करी होत असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकत वाहनाला थांबवले. तपासणीदरम्यान टेम्पोच्या मागील बाजूस फळांचे रिकामे कॅरेट ठेवून आतमध्ये खास बनवलेल्या लपवलेल्या कप्प्यात पंजाब राज्य निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असा मद्यसाठा आढळून आला.
या कारवाईत 9 ONE व्हिस्कीचे १२३ बॉक्स, किंमत रुपये ११,०७,८००/-, तसेच एसएमएल कंपनीचा MH-15-EG-9699 हा टेम्पो, किंमत रुपये ८,००,०००/- असा एकूण रुपये १९,०७,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी आशिष अमरचंद फिरोदीया (वय ५४, रा. प्रियंका ब्लॉसम, सिरीन मिडोज, आनंदवल्ली, नाशिक) यास घटनास्थळीच ताब्यात घेतले. आरोपी हा स्वतःच्या मालकीच्या वाहनात अवैध मद्यसाठा घेऊन काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे फिरोदीया हा सराईत गुन्हेगार असून नाशिक शहर व ग्रामीण हद्दीत दरोडा व दारूबंदी कायद्यांतर्गत यापूर्वी सात गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे.
या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३१६/२०२५, भा.दं.सं. कलम २२३ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
संपूर्ण कारवाई एसपी बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोउनि सुदर्शन बोडके, अंमलदार विनोद टिळे, संदीप नागपूर, सतीश घुटे, तसेच तांत्रिक विभागातील हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम व नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली.



