कृषी पंचनामे करण्यात हायगयी झाल्यास त्याची गय केली जाणार नाही . आ . कांदे
Mandgaon Mews

कृषी पंचनामे करण्यात हायगयी झाल्यास त्याची गय केली जाणार नाही .
॥नांदगांव दि 3 ऑक्टोबर २०२५॥
आमदार सुहास कांदे यांनी नुकतेच मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकारकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.
बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना आमदार कांदे म्हणाले :
“शेतकरी आपल्या पिकाची काळजी जशी आई-वडील आपल्या लेकरांची घेतात तशी घेतो. पण अतिवृष्टीमुळे बळीराजाची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत आपण त्याला आधार देणे हीच खरी सेवा आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने प्रामाणिकपणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करावा. कोणतीही दिरंगाई न करता वेळेत अहवाल सादर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा.”
ते पुढे म्हणाले की,
“शेतकरी रागावला तरी त्याचे म्हणणे ऐकून घ्या, त्याला समजावून सांगा. पण त्याला मदत करणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे. कामात हयगय झाल्यास सहन केली जाणार नाही. कुणालाही अडचण आल्यास ती मला सांगा, मी स्वतः मंत्रीस्तरावर ती सोडवीन.”
तहसीलदारांनी बैठकीत सध्या सुरू असलेल्या पंचनाम्यांची माहिती दिली. तर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना कोणतीही अडवणूक न करता प्रत्यक्ष सहकार्य करू असे आश्वासन दिले.
आमदार सुहास कांदे यांनी पुढील आठवडाभरात पंचनाम्यांचे काम पूर्ण करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.


