मनमाडः [ दि 4 सप्टेंबर 2025 ]
मनमाड ( ता . नांदगांव )शहरात हजरत मोहम्मद पैगंबर जयंती व ईद-ए-मिलाद-उन-नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली शांतता समितीची बैठक हा समाजात सौहार्द व एकतेचा उत्तम संदेश देणारा उपक्रम ठरला आहे.
गणेशोत्सव आणि ईद हे दोन मोठे सण जवळजवळ एकाच कालखंडात येतात. अशा वेळी, उत्सव साजरा करताना परस्परांचा सन्मान व सौहार्दाचे भान ठेवणे ही खरी सामाजिक जबाबदारी आहे. गणेश विसर्जनानंतर मिरवणूक काढण्याचा घेतलेला निर्णय केवळ प्रशासकीय दृष्टीने योग्य नव्हे, तर धर्मनिरपेक्ष सहअस्तित्वाची जाणीव जागवणारा आहे.
मिरवणुकीत डीजे व रथ वेळेत काढणे, वाहतूक कोंडी टाळणे आणि परवानगीचे नियम पाळणे ही बंधने काहींना औपचारिक वाटू शकतात. परंतु वास्तवात हीच पावले शांततेचे आणि शिस्तबद्धतेचे मूळ आधारस्तंभ ठरतात. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून मुस्लिम समाजाने या निर्णयांचे स्वागत केले, ही एक लोकशाहीवादी परिपक्वता म्हणावी लागेल.
आजच्या काळात धर्माच्या नावावर द्वेष पसरवण्याचे प्रयत्न होत असताना, मनमाडच्या या बैठकीतून निघालेला संदेश वेगळा आहे — “सण साजरे करा, पण सौहार्द विसरू नका.” समाजातील मान्यवर, कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांची ही एकत्रित भूमिका म्हणजे सामाजिक ऐक्याची खरी ताकद होय.
मनमाडसारख्या शहरांनी दाखवून दिलेला हा आदर्श इतरत्रही अनुकरणीय ठरावा, हीच अपेक्षा.



