लासलगावच्या २२ बस गौरी – गणपतीसाठी मुंबईला रवाना , २० बसेसवर चालणार लासलगाव आगाराचा कारभार, या मार्गावरील गाड्या होणार रद्द..

वेगवान नाशिक | किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दि. २४ ऑगस्ट २०२५ :- गौरी-गणपती सणासाठी मुंबईहून कोकणकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लासलगाव आगारातून तब्बल २२ बस रवाना करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख सौ.सविता काळे यांनी दिली. या निर्णयामुळे लासलगाव आगारातील काही महत्त्वाच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून स्थानिक प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
राज्य परिवहन मंडळाने उत्सव काळातील विशेष प्रवाशांची सोय करण्यासाठी हा निर्णय घेतला असला, तरी सकाळच्या सत्रातील लासलगाव–नाशिक, अमळनेर, संभाजीनगर, धुळे, चांदवड आणि सुरगाणा अशा महत्त्वाच्या मार्गांवरील फेऱ्या रद्द झाल्या आहेत. या मार्गांवर दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार प्रवास करतात. अचानक फेऱ्या बंद झाल्याने त्यांना ताटकळत थांबावे लागणार असून वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. गणपतीच्या प्रवाशांची सोय गरजेची आहे, पण त्यासाठी स्थानिक प्रवाशांना वाऱ्यावर सोडणे चुकीचे आहे असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
◆ शेतकरी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय
सकाळच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने शेतीमाल बाजारात घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात व वेळेवर कामावर जाणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. काही फेऱ्या उशिराने सुटणार असल्याची माहिती देण्यात आली असून, ऐनवेळी फेऱ्या बंद होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
◆ लासलगाव आगार प्रमुखांची माहिती
लासलगाव आगाराकडे एकूण ४२ बस असून, त्यापैकी २२ बस मुंबईसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. सकाळच्या लांब पल्याच्या फेऱ्या बंद राहतील, मात्र ग्रामीण भागातील बसेस नियमित सुरु राहतील. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जादा फेऱ्या सुट्टीच्या दिवशी बंद ठेवण्यात आल्या असून, सोमवार ते शनिवार त्या नियमित सुरु राहतील. उत्सव काळात प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन आगार प्रमुख सौ.सविता काळे यांनी केले आहे.



