वणी शहरातील वीज पुरवठा खंडित, नागरिक त्रस्त

वेगवान नाशिक/ सागर मोर
वणी, दि. १९ ऑगस्ट: गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात सुरू असलेल्या सततच्या आणि अनिश्चित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसातून आणि रात्रीतून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
अनेक समस्यांचा सामना वणी ग्रामस्थांना करावा लागत आहे.विज पुरवठा खंडीत झाल्मयावर महावितरणच्या वणी येथील सब-स्टेशनला फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे
देखभाल-दुरुस्तीसाठी शनिवार हा दिवस राखीव असतानाही, इतर दिवशीही दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज गेल्याने डासांचा त्रास वाढला असून, पथदिवे बंद असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
यामुळे शहरात चोरीचे प्रमाण वाढण्याची भीतीही नागरिकांमध्ये आहे.दोन दिवसांपूर्वी दामोदर नगर भागात अचानक जास्त वीजप्रवाह आल्याने काही घरांमध्ये विजेची उपकरणे जळाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या गंभीर बाबींची दखल घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वणी येथील नागरिक करत आहेत.



