भव्य रोजगार सोहळा; ६५० हून अधिक युवकांना ऑफर लेटर
वेगवान मराठी : मारुती जगधने
दिनांक१ मार्च २०२६
Suhas Kande आणि सौ. अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून Nandgaon येथे भव्य रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास मतदारसंघातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यापैकी तब्बल ६५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ऑन-द-स्पॉट ऑफर लेटर प्रदान करण्यात आले.
या रोजगार मेळाव्यात किमान ₹१२,००० ते ₹८०,००० मासिक वेतन असलेल्या विविध नोकऱ्यांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, सर्व मुलाखती पूर्णतः मोफत घेण्यात आल्या असून कोणताही अतिरिक्त खर्च आकारण्यात आलेला नाही. निवड झालेल्या तरुणांना तत्काळ नोकरीवर रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
५० हून अधिक कंपन्यांची उपस्थिती
या मेळाव्यात जवळपास ५० विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांना त्वरित ऑफर लेटर प्रदान केले.
आजवर मतदारसंघातील ५,००० पेक्षा अधिक युवक-युवतींना नाशिक, सिन्नर, मुंबई, जळगाव अशा विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सामाजिक बांधिलकी जपत रोजगार निर्मिती
यावेळी बोलताना आमदार सुहास कांदे यांनी सांगितले की,
“मतदारसंघातील १०वी, १२वी उत्तीर्ण तसेच डिप्लोमा आणि पदवीधर युवक-युवतींना योग्य नोकरी मिळावी, त्यांनी स्वावलंबी व्हावे आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.”
या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपत नियमित रोजगार भरतीचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान, नगराध्यक्ष सागर हिरे, संयोजक रवींद्र देवरे (नाशिक), शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक तसेच उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, प्रकाश शिंदे, प्रमोद भाबड, वाल्मीक जगताप वाल्मीक टिळेकर, चेतन पाटील, दीपक पांडव, गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य झारखंडे , गणेश शिंदे, महिला आघाडीच्या विद्या जगताप, संगीता बागुल, खुशाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
एकूणच, नांदगावातील हा रोजगार मेळावा युवकांसाठी आशेचा किरण ठरला असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीचा आदर्श उपक्रम म्हणून पाहिला जात आहे.



