ग्राम महसूल अधिकाऱ्यास दमदाटी करत माती सह ट्रॅक्टर चालक फरार
ग्राम महसूल अधिकाऱ्यास दमदाटी करत माती सह ट्रॅक्टर चालक फरार
सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दि.३० जुलै २०२५ :- नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरातील खानगाव थडी शिवारातून ट्रॅक्टर – ट्रॉलीद्वारे बेकायदेशीररीत्या मातीची वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टर चालकास ग्राम महसूल अधिकाऱ्याने थांबविल्याने संबंधित व्यक्तीने त्यांना दमदाटी करत ट्रॅक्टरसह पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात आरोपी भारत जगताप याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक २८ जुलै २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. आरोपी भारत जगताप याने महिंद्रा कंपनीच्या लाल रंगाच्या नंबर नसलेल्या ट्रॅक्टरला नंबर नसलेली ट्रॉली जोडून विनापरवाना माती भरून वाहतूक करत असताना ग्राम महसूल अधिकारी योगेश सुधाकर करपे यांनी त्याला अडवले. यावेळी भारत जगताप हा घटनास्थळी येऊन, “तुम्हांला माझाच ट्रॅक्टर दिसतो का? इतर ट्रॅक्टर तुम्ही पकडत नाही. माझा ट्रॅक्टर सोडून द्या, नाहीतर काहीही करून मी ट्रॅक्टर घेवून जाणार. जे करता येईल ते करून घ्या,” अशा शब्दांत धमकी दिली. त्यानंतर चालकास ट्रॅक्टर सुरू करण्यास सांगून ट्रॉलीतील अंदाजे एक ब्रास माती घेऊन ट्रॅक्टरसह पळ काढला.
या घटनेत महसूल अधिकारी करपे शासकीय काम बजावत असताना त्यांना दमदाटी व अडथळा निर्माण करण्यात आला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि बेकायदेशीररीत्या माती वाहून नेल्याप्रकरणी करपे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जगताप विरुद्ध गु.र.नं. १३४/२०२५ अन्वये भा.दं.वि. २०२३ चे कलम १३२, ३०३(२), ३०४(२), ३५१(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) व खाण अधिनियम १९५२ चे कलम ३, ४ अंतर्गत सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सहाणे करत आहेत.



