शेती

महाराष्ट्रातील या तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ; रोज होताय रात्रीतून फळबागा शेतीपीके नष्ट

महाराष्ट्रातील या तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ; रोज होताय रात्रीतून फळबागा शेतीपीके नष्ट

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला दि. २ जानेवारी :- येवला तालुक्यातील बोकटे, दुगलगाव, देवळाने आदी परिसरात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतांवर धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सततच्या या हल्ल्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, तातडीने पीक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
या परिसरात बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शेतकरी आले, कांदा, ऊस, फळबागा आदी पिकांची लागवड करत असून, त्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. तसेच ऊस व फळबागांचे क्षेत्रही दिवसेंदिवस वाढत आहे.
उत्पादन वाढीसाठी शेतकरी नवनवीन प्रयोग करत असून, त्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र वन्यप्राण्यांमुळे, विशेषतः रानडुकरांमुळे पिकांचे सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
नुकतेच बोकटे येथील शेतकरी बाळासाहेब दाभाडे यांच्या नारळ बागेचे रानडुकरांच्या कळपाने मोठे नुकसान केल्याची घटना घडली आहे. यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वन विभागाकडून पंचनामे केले जात असले तरी मिळणारी नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया :
शेतीसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे. मात्र रानडुकरांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. याचा थेट परिणाम आमच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे. वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन तातडीची कारवाई करावी.
बाळासाहेब दाभाडे,
नुकसानग्रस्त शेतकरी, बोकटे, ता. येवला

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!