चंदनपुरी – खंडोबा महाराज ते म्हाळसा व भानू यांचा सांस्कृतिक महोत्सव
Nandgaon / Malegaon news
चंदनपुरी – खंडोबा महाराज ते म्हाळसा व भानू यांचा सांस्कृतिक महोत्सव
खंडेरायाच्या लग्नाला वऱ्हाडी कोण… कोण… खंडेरायाच्या यात्रेला भाविक कोण… कोण…
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि. 4 जानेवारी 2026
चंदनपुरी (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथे श्री खंडोबा महाराज, म्हाळसा व भानू यांच्या जागृत देवस्थानाची वार्षिक पौष पौर्णिमा यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरू झाली आहे. “प्रति जेजुरी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनपुरीत राज्यासह परराज्यातून हजारो भाविक दाखल झाले आहेत.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा महाराजांचे हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे खंडोबा, म्हाळसा आणि भानू यांच्या मूर्ती एकत्र प्रतिष्ठापित आहेत. पारंपरिक आख्यायिकेनुसार खंडोबा महाराजांनी धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या घरी चाकरी केली व मेंढ्या पुन्हा जिवंत केल्याच्या चमत्कारानंतर बाणाईशी विवाह केला, अशी लोकश्रद्धा आहे.
मंदिर परिसरात खंडोबा महाराजांच्या घोड्याचे ठसे, शिवलिंग आणि नंदी ही श्रद्धास्थाने भाविकांचे विशेष आकर्षण ठरतात.
यात्रेची वैशिष्ट्ये
पौष पौर्णिमा व चैत्र शुद्ध पौर्णिमेला येथे भव्य यात्रा भरते.
यात्रेदरम्यान —
भंडारा व खोबऱ्याची मुक्त उधळण
खंडेराय, म्हाळसा व भानू यांच्या पालख्या
“येळकोट… येळकोट… जय मल्हार”चा गजर
जागरण-गोंधळ, नवस फेड, तळी भरणे
दहा दिवस चालणारा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा
यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारून जातो.
भाविकांची गर्दी, लोकजीवनात उत्साह
चंदनपुरी यात्रेसाठी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, ठाणे, मुंबई तसेच मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. अनेक भक्त दहा दिवस मुक्कामी राहत देवदर्शन घेतात.
यात्रेदरम्यान वाघे, मुरळी व गोंधळी आपल्या पारंपरिक जागरण-गोंधळ सादर करतात. त्यामुळे लोककला टिकून राहण्यासोबतच अनेक कलाकारांच्या उपजीविकेचे साधनही येथे निर्माण होते. हजारो दुकाने यात्रेत थाटली असून नारळ, फुले, खोबरे, भंडारा व प्रसादाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे.
दररोज हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावत असून “गरिबांचा भोळा देव” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनपुरीच्या खंडेरायाला भाविक भक्तिभावाने नतमस्तक होत आहेत. विशेष म्हणजे हजारो नवविवाहित जोडपी खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी येथे येत असून आपल्या संसाराच्या मंगल प्रारंभासाठी आशीर्वाद घेत आहेत.
चंदनपुरीची खंडोबा यात्रा म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा, लोकपरंपरा, संस्कृती आणि लोकजीवन यांचा एक भव्य संगम ठरत आहे — आणि म्हणूनच
“खंडेरायाच्या यात्रेला भाविक कोण… कोण…” हा जयघोष सार्थ ठरत आहे.
येळकोट… येळकोट… जय मल्हार! यात्रेत कोटी कोटी च्या संख्येने भाविक जय मल्हार चा जयघोष करतात .



