नामपूर:- स्कुटीला कंटेनरची धडक ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

नामपूरला स्कुटीला कंटेनरची धडक ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.१५:-बागलाण तालुक्यातील रातीर गावातील एक ज्येष्ठ महिला बाजारातून घरी परत जात असताना कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता नामपूर गावात घडली.
सिंधुबाई वसंत शिंदे (वय ६५, रा. मौजे रातीर) या त्यांचा मुलगा रवींद्र शिंदे याच्यासोबत त्यांची मालकीची स्कुटी (क्र. एम.एच. ४१ बी.के. ५७९५) घेऊन नामपूर गावातील बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. खरेदी करून परत जात असताना आनंद भेळ भत्ता दुकानाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनर (क्र. एम.एच. १५ एफ.व्ही. ७७४७) ने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात सिंधुबाई शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातास कारणीभूत असलेल्या कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.



