Uncategorized

बस चालकास बेदम मारहाण; लासलगाव आगारात संपामुळे बससेवा ठप्प, आरोपींच्या विरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.२२ सप्टें २०२५ :- लासलगाव आगारातील एका बस चालकास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार (दि.२२) सकाळी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. त्यामुळे सुमारे अर्धा तास बससेवा ठप्प राहून प्रवाशांचे हाल झाले. मात्र, सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मध्यस्थीने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले व वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
दि.२१ सप्टेंबर रोजी एम.एच.१४ एल.एक्स.७४३३ ही बस नाशिक – निफाड मार्गावर होती. चालक आरिफ गफार शेख व वाहक मयूर उत्तम चौधरी कर्तव्यावर असताना ओढा परिसरात रात्री सव्वा आठच्या सुमारास पिवळ्या स्कूल बसने कट मारला. प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या खाली उतरवली आणि मोठा अपघात टळला. यानंतर साडेआठच्या सुमारास स्कूल बस चालकाने नागापूर बसस्थानकाजवळ बस थांबवून बस चालकास शिवीगाळ करत, चापटी, लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्याच्या पत्नीनेही धक्काबुक्की केली. याचवेळी फोनवर बोलावून आणलेले तीन अनोळखी इसमही तेथे आले. त्यांनी देखील ‘लेडीजवर हात उचलतो का?’ असा जाब विचारत बस चालकाला चापटीने मारहाण केली. ही घटना समजताच लासलगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक संप पुकारला. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांनी तातडीने आगार गाठून कर्मचाऱ्यांची समजूत काढली. कर्मचाऱ्यांनी निवेदन देत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. शिंदे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास ढोकरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. मात्र, आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास पुन्हा संप पुकारण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, सायखेडा पोलीस ठाण्यात वाहक मयूर चौधरी यांच्या फिर्यादीवरून स्कूल बस चालक माणिक टर्ले, त्यांची पत्नी व इतर दोन इसमांविरोधात भा.दं.वि. कलम १३२, ११५(२), ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. विकास ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. मोठाभाऊ जाधव अधिक तपास करीत आहेत.

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!