नैताळे यात्रेत चोरी करणारा आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद निफाड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; भाविकांतून समाधान

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दि.५ जानेवारी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यांच्या नैताळे येथील यात्रोत्सवात गर्दीचा गैरफायदा घेत चोरी करणाऱ्या आरोपीस निफाड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करून प्रभावी कारवाई केली. या वेगवान कामगिरीमुळे यात्रोत्सवात चोरी करणाऱ्या चोरट्यांना चांगलाच पायबंद बसला असून भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
फिर्यादी पुजा सचिन आहेर (वय २८) या आपल्या मुलगी धनवीसह दि. ४ जानेवारी रोजी नैताळे यात्रेसाठी आल्या होत्या. यावेळी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मतोबा मंदिरासमोर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या मुलीच्या गळ्यातील अंदाजे ७ हजार रुपये किंमतीचे सुमारे ७०० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे ओमपान चोरून नेले. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गु.र.न. ०५/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२)(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी रविवार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती, त्यामुळे आरोपी पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या दोन तासांत आरोपी रवी पिराजी मांजरे (वय ३७, रा. गणेशवाडी, भाजीमार्केट परिसर, पंचवटी, नाशिक) यास ताब्यात घेण्यात आले.
सध्या आरोपी निफाड पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोलीस हवालदार पो. हवा शिंदे करीत आहेत. निफाड पोलिसांच्या या जलद आणि परिणामकारक कारवाईचे भाविकांसह नागरिकांकडून कौतुक होत आहे.
यात्रोत्सवाच्या काळात भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. चोरीच्या घटनेची तात्काळ दखल घेऊन तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत आरोपीस अटक करण्यात आली आहे. यात्रेत गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहील.
मा.गणेश गुरव
पोलिस निरीक्षक



