‘गड-किल्ले गौरवशाली इतिहासाचे दीपस्तंभ’ — प्रा. अमित निकम

‘गड-किल्ले गौरवशाली इतिहासाचे दीपस्तंभ’ — प्रा. अमित निकम
‘ सटाणा महाविद्यालयात जागतिक पर्यटन दिन साजरा’
सटाणा दि.२आक्टोबर २०२५ : इतिहासात गड-किल्ल्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, महाराष्ट्र ही गड-किल्ल्यांची भूमी असून सह्याद्रीच्या रांगांमध्ये डौलाने उभे असलेले हे गड-किल्ले केवळ दगडी बांधकाम नसून, आपल्या गौरवशाली इतिहासाचे दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. अमित निकम यांनी केले. ते येथील मविप्र संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. प्रफुल्ल ठाकरे, प्रा. नानासाहेब निकम, प्रा. वंदना पाटील व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रा. निकम पुढे म्हणाले की, इतिहासापुरतेच नव्हे तर गड-किल्ले हे स्थापत्यकलेचेही उत्कृष्ट नमुने आहेत. दरवाजे, बुरुज, गुप्त दरवाजे, पाण्याची टाकी, मंदिरे, दरबार हॉल अशा अनेक वास्तू आजही त्यांच्या वैभवाची साक्ष देतात. हे सांगतांना त्यांनी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट केलेल्या साल्हेर किल्ल्याचा इतिहास जीवंत केला. साल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व विशद केले.
प्राचार्य डॉ. कृष्णा गायकवाड यांनी सांगितले की, बागलाण ही गड-किल्ल्यांची भूमी आहे, हे किल्ले आपल्या वारशाचे जतन करतात तसेच पर्यटकांना इतिहास, संस्कृती आणि निसर्ग या तिन्हींचा संगम अनुभवता येतो म्हणून गड-किल्ल्यांचे जतन करणे ही आजच्या काळाची गरज आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देण्यात आली, राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेचे हे पाचवे पुष्प होते. ह्या व्याख्यानमालेचा समारोप २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. वंदना पाटील यांनी मानले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे १०० विद्यार्थी कार्यक्रमात उपस्थित होते.



