
शाकंभरी नदीत तरुणाचा बुडून मृत्यू
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव, ॥ दि. ८ ऑक्टोबर २०२५ ॥
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात शाकंभरी नदीत एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.
नेहरूनगर, नांदगाव येथील रहिवासी शंतनू नीलेश आहिरे (वय १८) हा तरुण मांडवड येथे आपल्या काकाला रंगकामाच्या कामात मदतीसाठी आला होता. काम आटोपल्यानंतर तो मांडवड–हिसवळ रस्त्यावरील शाकंभरी नदीत अंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
शंतनू हा मनमाड महाविद्यालयात बारावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील नीलेश आहिरे हे मजुरीचे काम करतात. शंतनू हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेमुळे आहिरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, अलीकडील अतिवृष्टीमुळे शाकंभरी नदीला महापूर आला असून तिचा प्रवाह अजूनही जोरात आहे. काही दिवसांपूर्वी याच नदीपात्रात दोन म्हशींचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर नांदगाव नगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नगरपालिकेने नागरिकांना सूचना केली आहे की शाकंभरी व लेंडी नदीच्या पाणलोट क्षेत्रात नागरिकांनी खबरदारी घेऊन सुरक्षित स्थळी राहावे, असे संदेश मोबाईलवर पाठविण्यात आले आहेत.



