महाराष्ट्र,देश

चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू

Nandgaon News

चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि . १५ जानेवारी २०२५
चाळीसगाव : चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर हिरापूर गावाजवळील नूरानी मशिदीजवळ सोमवारी (दि. १२ जानेवारी) रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास भरधाव ‘आयशर’ ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातात मृत्यू पावलेले तिन्ही तरुण हे हिरापूर (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असून त्यांची नावे सागर संजय वराडे (वय २७), सोमनाथ संजय वराडे (वय ३२) आणि अक्षय बापू पाटील (वय ३०) अशी आहेत. सागर आणि सोमनाथ हे सख्खे भाऊ होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
बातमीनुसार, या अपघातामागे अनेक गंभीर कारणे असल्याचे स्पष्ट होत आहे. उच्च न्यायालयाने कन्नड औट्रम घाटातून जड वाहतूक बंद केल्याने छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी सर्व जड वाहतूक चाळीसगाव–नांदगाव–वैजापूर या मार्गाने वळवण्यात आली आहे. परिणामी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
याशिवाय या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. अपघात झालेल्या ठिकाणी हिरापूर, शिंदी फाटा, गणेशपूर आणि पिंप्री या गावांकडून येणारी वाहतूक मुख्य रस्त्याला मिळते. अशा संवेदनशील चौकात गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नसल्यामुळे वाहनांचा वेग अनियंत्रित राहतो, हेही अपघातास कारणीभूत ठरल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वारंवार पत्रव्यवहार करूनही या ठिकाणी गतिरोधक बसवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही आणि प्रशासकीय उदासीनतेमुळेच तीन निष्पाप तरुणांना जीव गमवावा लागला, अशी तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
हा अपघात केवळ तांत्रिक चूक नसून ढासळलेली रस्ते व्यवस्था आणि अपुरे प्रशासकीय नियोजन याचे फलित असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून संबंधित विभागाकडून काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!