विंचूरच्या शासकीय मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची थट्टा ; मका खरेदी उद्दिष्ट अवघ्या दोन दिवसांत संपले ; खरेदी न करताच शेतकऱ्यांना पाठवले माघारी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दि.३१ जाने :- निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विंचूर येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय मका खरेदी केंद्रातील मका खरेदीचे उद्दिष्ट अवघ्या दीड दिवसांतच संपल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. दि.३० जाने. रोजी अधिकृत मेसेजवर विश्वास ठेवून मका घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पोते उपलब्ध नसल्याचे कारण सांगत ट्रॅक्टरसह परत पाठवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे, हे शासकीय मका खरेदी केंद्र आहे की शेतकऱ्यांची थट्टा केंद्र? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निफाड तालुक्यात एकमेव शासकीय मका खरेदी केंद्र पिंपळगाव बसवंत येथे कार्यरत आहे. मात्र, लासलगाव परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन विंचूर येथे नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर सोयाबीनसाठी ४२५ तर मका खरेदीसाठी ८२५ अशा एकूण १,२५० शेतकऱ्यांकडून सुमारे ४,५०० मेट्रिक टन खरेदीची नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात विंचूर केंद्राला सुरवातीला केवळ १०० मेट्रिक टन मका खरेदीसाठी पन्नास किलो वजनाची अवघी दोन हजार पोती उपलब्ध करून देण्यात आली. नोंदणी डिसेंबर पासून सुरू असली तरी, उशिराने दि.२७ जानेवारी रोजी सौ.शेफाली भुजबळ यांचे हस्ते या खरेदी केंद्राचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. मात्र, अवघ्या दीड दिवसांतच उपलब्ध पोत्यांचा साठा संपल्याने मका खरेदी थांबवण्यात आली. ‘उद्या मका घेऊन या’ असा अधिकृत मेसेज मिळाल्यानंतर दि.३० जानेवारी रोजी सकाळपासून अनेक शेतकरी ट्रॅक्टर भरून मका घेऊन केंद्रावर दाखल झाले. मात्र, प्रत्यक्षात पोते उपलब्ध नसल्याने मका न घेताच शेतकऱ्यांना परत पाठवण्यात आले. यामुळे मेसेजवर विश्वास ठेवून मका काढून, सुकवून, ट्रॅक्टरमध्ये भरून आणलेल्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली. ट्रॅक्टर भाडे, मजुरी, इंधन तसेच वेळेचा खर्च करून आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. यामुळे ट्रॅक्टरच्या ये – जा भाड्याचा दुहेरी आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. या प्रकारानंतर संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंद सुरू असल्याने ऑटोमॅटिक पद्धतीने ‘शेड्युल’ मेसेज गेले, असे खरेदी केंद्राकडून सांगण्यात आले. मात्र, पोतेच उपलब्ध नसतील तर शेतकऱ्यांना मेसेज का पाठवले, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नियोजनाअभावी शासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी पोत्यांची, मनुष्यबळाची व आवश्यक साहित्याची पूर्तता करावी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
– शेतकरी आर्थिक अडचणीत
शासकीय खरेदीत मका २४०० रु तर सोयाबीन ला ५३२८ रु.प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे. या हंगामात २८३ टन सोयाबीन खरेदी केली. मात्र, शेतकऱ्यांना दोन महिन्यांनी तर जून मध्ये खरेदी केलेल्या कांद्याचे बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही देयके मिळाले नाही. त्यामुळे दोन पैशाच्या अपेक्षेने शासकीय खरेदी केंद्राला माल देऊन ते अधिकच आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. मात्र, वरूनच पुरवठा कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तरीही बारदान व उद्दिष्ट वाढीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
विशाल नाईकवाडे,
तहसिलदार, निफाडशासकीय मका खरेदी केंद्राकडून विंचूर खरेदी केंद्रावर मका घेऊन या असा दि.२९ जाने रोजी संदेश आल्याने मी ट्रॅक्टर घेऊन गेलो, मात्र तिथे प्रत्यक्षात बारदान शिल्लक नसल्याचे सांगत मला परत पाठविण्यात आले. त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
बारकू सानप
मका उत्पादक, पाचोरे बु



