नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

दहेगाव धरण बारा वर्षानंतर भरले

Nandgaon News

दहेगाव धरण १२ वर्षांनंतर भरून वाहिले

नांदगावकरांचा आनंद – पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता

वेगवान मराठी : मारुती जगधने 

[नांदगाव, दि २८ सप्टेंबर 2025 ] सुमारे बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नांदगाव शहरासाठी जीवनरेखा ठरलेले दहेगाव धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. लेंडी नदीवर बांधलेले हे धरण दीर्घकाळानंतर ओसंडून वाहू लागल्याने नांदगाव शहराचा आगामी काही महिन्यांसाठी पाणीपुरवठा नियमित व सुरळीत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

पालिका प्रशासन सज्ज

धरणाच्या स्थितीचा व शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव स्वतः टीमसह सज्ज झाले आहेत. धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे नियोजन, जलसाठ्याचे व्यवस्थापन आणि आगामी हंगामातील पाणीपुरवठा याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

लेंडी नदीला पूर – नुकसान टळले

धरण पूर्ण भरल्याने लेंडी नदीच्या पात्रात पूर आला. तथापि, या पुरामुळे मोठे नुकसान झालेले नाही. उलट नदीपात्रातील घाण, कचरा व गाळ पूर्णपणे धुऊन निघून गेल्याने नदी ताजी व स्वच्छ दिसू लागली आहे.

नागरिकांचा आनंदोत्सव

धरण वाहू लागल्याची बातमी कळताच शहरातील व आसपासच्या नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली. धरणावरून झरझर कोसळणारे पाणी पाहण्यासाठी लोकांनी आनंदाने जल्लोष केला. “अनेक वर्षांनंतर हा क्षण पाहायला मिळतोय, यंदा पाणीटंचाईची भीती नाही,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

पाणीपुरवठा सुरळीत होणार

पालिका प्रशासनाच्या मते, या धरणात साठलेले पाणी शहरासह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी पुरेसे आहे. मागील काही वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे दहेगाव धरण कोरडे राहिले होते. यंदा मात्र मुसळधार पावसामुळे धरण शंभर टक्के भरल्याने आगामी उन्हाळ्यातही शहरवासीयांना पाणीटंचाई जाणवणार नाही.

तसे नांदगाव शहरासाठी गिरणा धरण आणि माणिक गुणधरणातून देखील पाणीपुरवठा होत असतो आता दहेगाव धरण भरल्याने दुधात साखर पडल्यासारखे झाले आहे .त्यामुळे आता नांदगाव वाशियांना दैनंदिन पाणी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!