शेती

“…अन्यथा ‘झोप मोड आंदोलन’ छेडण्याचा इशारा”

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : तालुक्यातील शिवारात रात्रीच्या वेळेस होणारा अनियमित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून शेतकऱ्यांना नियमित वीज उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. वीजपुरवठ्याची समस्या तातडीने मार्गी न लागल्यास महावितरण कार्यालयासमोर ‘झोप मोड आंदोलन’ करण्याचा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे.

सध्या शिवारात मका, बाजरी, डाळिंब आदी पिके जोमात असून अनेक शेतकरी कुटुंबांसह शेतात वास्तव्यास आहेत. मात्र रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे तसेच भारनियमनामुळे शेतकऱ्यांना अंधारात राहण्याची वेळ येत आहे. पिकांची उंची वाढल्याने शिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकरी, महिला, लहान मुले आणि पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब निंबा पगार यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या देवळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या वीज समस्येबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून रात्रीचा वीजपुरवठा नियमित व अखंडित करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक इंजि. कुबेर जाधव, शिवसेना प्रणित शेतकरी सेलचे अध्यक्ष कृष्णा जाधव यांच्यासह संबंधित पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

“वीज ही केवळ शेतीसाठी नव्हे, तर शिवारात वास्तव्यास असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठीही अत्यावश्यक आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने दखल घेऊन रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा ‘झोप मोड आंदोलन’ करण्यात येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!