महाराष्ट्र,देश

बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी नांदगावात उपोषण

Nandgaon news

बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी नांदगावात उपोषण
आरोग्य विभागाच्या कारभारावर उपोषणकर्त्यांचा सवाल; ‘बोगस डॉक्टरांची यादी आम्ही का द्यायची?’
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव, दि. २ सप्टेंबर : नांदगाव तालुक्यात सर्रासपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नांदगाव येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी उपोषणाचा पहिला दिवस होता.
नांदगाव तालुक्यात अनेक ठिकाणी कोणतीही अधिकृत वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. अशा कथित बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘यादी मागविण्याऐवजी प्रशासनाने स्वतः चौकशी करावी’
दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती नांदगाव यांनी उपोषणकर्त्यांची यानी . यावेळी उपोषणकर्त्यांकडूनच बोगस डॉक्टरांची यादी मागविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. बोगस डॉक्टरांचा शोध घेणे, त्यांची पात्रता तपासणे आणि दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करणे ही संबंधित आरोग्य विभागाची जबाबदारी असताना उपोषणकर्त्यांकडूनच यादी मागविण्यात येत असल्याबद्दल उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
बोगस डॉक्टरांना औषधांचा पुरवठा कोण करतो?
कथित बोगस डॉक्टरांना घाऊक दराने औषधे व गोळ्या उपलब्ध होत असल्याचा मुद्दाही उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांना औषधांचा पुरवठा कोणत्या माध्यमातून व कोणाकडून केला जातो, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे यापूर्वी अनेक वेळा तक्रारी व निवेदने देण्यात आली असूनही त्याची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या उपोषणात सचिन भालेकर, प्रवीण गुप्ता, खैरनार आणि महाजन सहभागी झाले आहेत. उपोषणाच्या पहिल्या दिवशी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली.
नांदगाव तालुक्यातील कथित बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी सातत्याने करण्यात येत असतानाही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कथित बोगस डॉक्टरांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!