नाशिक ग्रामीण

उमराणे येथे पहाटेचा थरार! १८ गुन्ह्यांचा इतिहास असलेला सराईत गुन्हेगार ‘धड्या’ जेरबंद; सोनवणे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : गुरुवार (दि. ४) रोजी पहाटेच्या सुमारास घरफोडीच्या उद्देशाने घुसलेल्या एका सराईत गुन्हेगाराने घरमालक व त्यांच्या कुटुंबीयांवर स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली. मात्र, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सोनवणे कुटुंबाने आणि धावून आलेल्या ग्रामस्थांनी दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे या अट्टल चोराला पाठलाग करून रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर जळगाव जिल्ह्यात तब्बल १८ ते १९ गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी गोरख सुरेश सोनवणे यांच्या घरात ही घटना घडली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सोनवणे कुटुंबातील सर्व सदस्य घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. पहाटे ४ वाजेच्या सुमारास खालच्या घरातून काहीतरी खटखट असा संशयास्पद आवाज आल्याने गोरख सोनवणे यांना जाग आली. त्यांनी खाली येऊन पाहिले असता घराचे कुलूप तुटलेले आणि मुख्य दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात चोर घुसल्याची खात्री पटताच त्यांनी तातडीने वर जाऊन आपले भाऊ पंढरीनाथ सोनवणे, पुतण्या जगदीश व इतर नातेवाईकांना जागे केले.

सोनवणे कुटुंबीय चोराला पकडण्यासाठी घरात शिरले असता, समोर उभ्या असलेल्या चोरट्याने हिंदीत “मुझे हात लगाना नही, नही तो मै तुम्हारा कांड कर दूंगा!” अशी धमकी दिली. इतक्यावरच न थांबता त्याने आपल्या हातातील स्क्रू ड्रायव्हरने कुटुंबीयांवर थेट जीवघेणा हल्ला चढवला. आरोपीला पकडण्यासाठी पुढे सरसावलेल्या पंढरीनाथ सोनवणे यांच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हर खुपसण्याचा प्रयत्न चोरट्याने केला, मात्र त्यांनी वार चुकवल्याने तो उजव्या डोळ्याजवळील भुवईवर बसला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपीने पुतण्या जगदीश यांच्यावरही वार केले, ज्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताच्या बोटाला दुखापत झाली.

दोन सदस्यांना जखमी केल्यानंतर चोरट्याने गोरख सोनवणे व त्यांच्या भाच्याला धक्काबुक्की करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जखमी अवस्थेतही सोनवणे कुटुंबीयांनी हिंमत हारली नाही. गोरख, आकाश आणि जगदीश यांनी आरडाओरडा करत चोराचा थरारक पाठलाग केला. काही अंतरावर धावताना चोरट्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला. याच संधीचा फायदा घेत सोनवणे कुटुंबीयांनी त्याला जागीच दडपून धरले. दरम्यान, आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी आरोपीला काबूत ठेवले.

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव मुख्तार शेख महबूब शेख उर्फ ‘धड्या’ (रा. नूरानी नगर, चारगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याजवळील पिशवीची झडती घेतली असता स्क्रू ड्रायव्हर, पक्कड (पाना), लोखंडी कटावणी, धारदार हत्यार, मोटरसायकलच्या चाव्या आणि वाहनाची बनावट नंबर प्लेट आढळून आली. तसेच सोनवणे यांच्या घरातून त्याने चोरलेल्या सुमारे २,००० रुपये किमतीच्या चांदीच्या साखळ्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत. पकडण्यात आलेला आरोपी ‘धड्या’ हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाचोरा व जळगाव परिसरात १८ ते १९ घरफोडी व रॉबरीचे गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध घरफोडी, चोरी आणि खुनाचा प्रयत्न यासह भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि देवळा पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे उमराणे आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!