महाराष्ट्र,देश
तुकाराम मुंडेंच्या ‘धडक’ मोहिमेला शासनाने द्यावे बळ; भाऊसाहेब पगार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) नवे आयुक्त आयएएस तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच राज्यात भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. त्यांच्या या धडक कारवाईला राज्य शासनाने पूर्ण प्रशासकीय पाठबळ द्यावे आणि मुंडे यांना या पदावर किमान ३ वर्षांचा पूर्ण कार्यकाळ द्यावा, अशी आग्रही मागणी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब निंबा पगार यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
‘अल्पावधीतच जनतेचा विश्वास जिंकला’
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार आणि मुख्य सचिव यांना पाठवलेल्या या पत्रात भाऊसाहेब पगार यांनी जनतेच्या भावनांना वाट करून दिली आहे.
“तुकाराम मुंडेंनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध, फळे, बनावट औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या काळ्याबाजारावर सळो की पळो करून सोडले आहे. त्यांच्या या धडक कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये आरोग्याप्रती मोठा विश्वास निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत,” असे पगार यांनी पत्रात नमूद केले आहे.
भेसळ हा मानवी जीवनाशी खेळ!
राज्यातील अन्न आणि औषधांमधील भेसळीच्या चिंताजनक परिस्थितीवर बोट ठेवत पगार पुढे म्हणाले की, भेसळीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असून लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न-औषधांमधील भेसळ हा केवळ कायद्याचा भंग नसून थेट मानवी जीवनाशी खेळण्याचा गंभीर प्रकार आहे. अशा प्रवृत्तींवर कठोर अंकुश ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.
पत्रातील मुख्य मागण्या:
१) ३ वर्षांचा पूर्ण कार्यकाळ: प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता किमान ३ वर्षे याच पदावर काम करण्याची संधी मिळावी.
२) शासनाचे भक्कम पाठबळ: अन्न व औषध प्रशासनाला पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक ती सर्व साधने आणि प्रशासकीय सहकार्य शासनाकडून तात्काळ पुरवले जावे.
३) भेसळमुक्त महाराष्ट्र: जनतेच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी शासनाने या मोहिमेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.
…तर ‘भेसळमुक्त महाराष्ट्र’ शक्य!
तुकाराम मुंडे यांच्यासारखे कडक शिस्तीचे आणि जनहिताला प्राधान्य देणारे अधिकारी या विभागाला लाभणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालून मुंडे यांना प्रभावीपणे काम करण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे झाल्यास ‘भेसळमुक्त महाराष्ट्र’ शक्य आहे. अशी कळकळीची विनंती भाऊसाहेब पगार यांनी केली आहे. आता यावर राज्य शासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



