नाशिक जिल्ह्यातील दोन फौजदारांसह दोन पंटर अशा चौघांविरोधात दोन लाखांची लाच प्रकरणी गुन्हा दाखल ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई….

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात कार्यरत दोन पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पंटर असे चौघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १० जानेवारी २०२५) रात्री शासकीय विश्रामगृह, नाशिक येथे करण्यात आली.
या प्रकरणी एकनाथ गंगाराम पाटील, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७(अ) व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया मुंबईनाका पोलीस ठाण्यात सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपी पुढीलप्रमाणे आहेत
दत्तात्रय एकनाथ गोडे, पोलीस उपनिरीक्षक, मुंबईनाका पोलीस ठाणे, नाशिक
अतुल भुजंगराव क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक, मुंबईनाका पोलीस ठाणे, नाशिक
रमेश गंभीरराव आहीरे (वय ६१), उपहारगृह चालक, शासकीय विश्रामगृह, नाशिक
कल्पेश रमेश आहीरे (वय २८), उपहारगृह चालक, शासकीय विश्रामगृह, नाशिक (खाजगी इसम)
ला.प्र.वि.कडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळ तक्रारदार यांच्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. ३२५/२०२५ (बी.एन.एस. ३१६(२), ३१८(४), ३३६(२)(३)(४), ३३८, ३४०(२)) या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी तपास अधिकारी दत्तात्रय गोडे यांच्यासाठी खाजगी इसम कल्पेश आहीरे याने पंचासमक्ष दोन लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर दि. १० जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृह, नाशिक येथील उपहारगृहाच्या पाठीमागील बाजूस सापळा कारवाई दरम्यान दोन लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात आली, यामध्ये ३० हजार रुपये चलनी नोटा व १ लाख ७० हजार रुपये अचलनी स्वरूपात असल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम रमेश आहीरे याने पीएसआय दत्तात्रय गोडे यांच्यासाठी स्वीकारल्याचे तपासात स्पष्ट झाले असून पीएसआय अतुल क्षीरसागर व दत्तात्रय गोडे यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.
या यशस्वी सापळा कारवाईत एकनाथ पाटील (पोलीस उपअधीक्षक), पो.हवा. २५२ योगेश साळवे व पो.हवा. २५३८ दिनेश खैरणार (ला.प्र.वि. नाशिक) सहभागी होते.
या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, तसेच अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.



