या तालुक्यात बिबट्याचा वावर; वनविभागाची सतर्कता, पिंजरे लावून मोहीम सुरू
Nandgaon News
या तालुक्यात बिबट्याचा वावर; वनविभागाची सतर्कता, पिंजरे लावून मोहीम सुरू
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि 16 डिसेंबर 2025
नांदगाव तालुक्यातील सोयगाव–वडाळी परिसरात बिबट्या आढळून आल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे. याचबरोबर तालुक्यातील इतर काही भागांमध्येही बिबट्याच्या उपस्थितीच्या बातम्या मिळाल्याने वनविभागामार्फत त्या-त्या ठिकाणी देखरेख व पाहणी करण्यात येत आहे.
बिबट्याच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून, नांदगाव तालुक्यातील वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सकाळी भल्या पहाटे उठून परिसराचे सर्वेक्षण करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही तपासणी व पाहणी सुरू असून, सदर मोहीम आणखी चार दिवस चालणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे तसेच वनविभागास सहकार्य करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी हेमंत कोकाटे यांच्याकडून सांगण्यात आले .



