वाद मिटवायला गेलेल्या पोलीस पाटलास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण सहा आरोपींच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक ८ डिसेंबर २०२५ :- दोघांमध्ये झालेला वाद मिटविण्यास गेलेल्या पोलिस पाटलास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार सारोळेथडी ता. निफाड येथे घडला आहे. याप्रकरणी सहा आरोपींच्या विरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पोलिस पाटील भाऊसाहेब खंडु बर्डे वय ३९ रा.सारोळेथडी हे दि.४ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास संदीप नागरे यांचे दुकानासमोरील मोकळ्या जागेत रविंद्र भिका पिपंळे व निखील भाऊसाहेब नाईक यांच्यात चाललेला वाद सोडविण्यास गेले होते.
यावेळी आरोपी किरण रतन नागरे, गणेश मधुकर नागरे, सचिन रमेश नागरे, प्रकाश चिंधा नागरे, कैलास शिवाजी आव्हाड व गणेश निवृत्ती नागरे यांनी कुरापत काढून जातीवाचक शिवीगाळ करत चल निघ, तू कसला पाटील? गावचे पाटील आम्ही आहोत’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. यापैकी आरोपी गणेश नागरे याने हातातील लाकडी काठीने फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीचे वडील, आई व भाऊ भांडण सोडविण्यास आले असता, आरोपींनी त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करून हाताच्या चापटी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पीडित पोलिस पाटील यांचे या फिर्यादीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात गु.र.न.२७९/२०२५ प्रमाणे अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारित २०१५ चे कलम ३(१)(आर)(एस),३(२)(वी.ए), व भा.न्या.संहिता कलम १८९(२),१९१(२),१९१(३),१९०,११८(१),११५(२),३५२,३५१(२),३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी के.के. पाटील करत आहेत.



